नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’मधील सीमा सुरक्षा दला (बीएसएफ) च्या कामगिरीचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी कौतुक केले. पाकिस्तानच्या गोळीचे बीएसएफने गोळ्याने उत्तर दिले. यामुळे जोपर्यंत सीमेवर बीएसएफची तैनाती आहे, तोपर्यंत पाकिस्तानी सैन्य एक इंचही पुढे येऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असे अमित शाह म्हणाले. नवी दिल्ली येथे बीएसएफच्या पदग्रहण आणि रुस्तमजी स्मृती व्याख्यानाला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी उपस्थिती लावली. 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे पाकिस्तान आणि दहशतवादामधील संबंध संपूर्ण जगासमोर आले आहेत, असे ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर हे पंतप्रधान मोदींच्या प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचे, सशस्त्र दलांच्या अद्भुत शक्तीचे आणि गुप्तचर संस्थांच्या अचूक माहितीचा परिणाम आहे. आपल्या भूमीवरील दहशतवादी हल्ल्यांना प्रतिसाद देण्याच्या इतिहासातील सर्वात अचूक आणि साध्य केलेले उद्दिष्ट ऑपरेशन सिंदूर आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये, बीएसएफ आणि सैन्याने जगासमोर त्यांच्या अतुलनीय शौर्याचे उदाहरण ठेवले, असे अमित शाह यावेळी म्हणाले. संपूर्ण जग भारतीय सैन्याच्या शौर्याचे, शक्तीचे आणि संयमाचे कौतुक करत आहे, असे ते म्हणाले.
१९७१ च्या युद्धातील बीएसएफचे शौर्य आणि योगदान भारत कधीही विसरू शकत नाही आणि बांगलादेशनेही ते विसरू नये, असे अमित शाह म्हणाले. यावेळी त्यांनी १९६५ ते २०२५ पर्यंतच्या बीएसएफच्या प्रवासाचे भरभरुन कौतुक केले. कठीण परिस्थितीत कमी संसाधनांसह सुरू झालेली बीएसएफ आज जगातील सर्वात मोठे आणि सर्वात गौरवशाली सीमा सुरक्षा दल म्हणून आपल्यासमोर उभी आहे, असे ते म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत, ४५ अंशांपेक्षा जास्त किंवा खूप कमी तापमानात, घनदाट जंगलांमध्ये, दुर्गम पर्वतांमध्ये आणि समुद्रकिनाऱ्यावर बीएसएफला संरक्षणाची पहिली फळी आहे. सीमा सुरक्षेव्यतिरिक्त, बीएसएफने देशाच्या अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये देखील सक्रिय सहभाग घेतला आहे आणि त्याचे परिणाम साध्य केले आहेत. ते म्हणाले की, निवडणुका, कोरोना, क्रीडा क्षेत्र, दहशतवाद किंवा नक्षलवाद, बीएसएफने प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तव्य उत्तम प्रकारे बजावले आहे, असे ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरमध्ये बीएसएफचे मोहम्मद इम्तियाज अहमद आणि दीपक चिंगाखम यांनी मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले आणि त्यांची नावे देशाच्या संरक्षणाच्या इतिहासात कायमचे सुवर्णाक्षरांनी कोरली जातील, असे ते म्हणाले. बीएसएफ भारताच्या १५ हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या आणि सर्वात कठीण सीमेचे रक्षण करते, असे ते म्हणाले.