नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सशस्त्र सीमा बल (एसएसबी) महासंचालक दलजीत सिंह चौधरी यांच्याकडे सोपवला. बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल आणि विशेष उप महासंचालक योगेश बहादूर (वाय. बी.) खुरानिया यांना हटवण्याचा तातडीने निर्णय शुक्रवारी रात्री उशीरा घेण्यात आला. कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच बीएसएफचे महासंचालकपद सोडण्याची वेळ आलेले अग्रवाल हे पहिले अधिकारी ठरले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात वाढत्या दहशतवादी घटना पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा आहेत. (BSF)
१९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी दलजीत सिंह यांनी या वर्षी जानेवारीमध्ये एसएसबीचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. केंद्र सरकारने त्यांची १९ जानेवारीला एसएसबीच्या महासंचालकपदी नियुक्ती केली होती. एसएसबीचे महासंचालक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांची सीआरपीएफचे विशेष महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडे आता बीएसएफचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (BSF)
केंद्र सरकारने नितीन अग्रवाल यांना केरळ केडर आणि योगेश बहादूर खुरानिया यांना ओडिशा केडरमध्ये परत पाठवले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने ३० जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीला आदेश जारी करण्यास सांगितले होते. त्यानंतर वैयक्तिक प्रशिक्षण विभागाच्या संचालक साक्षी मित्तल यांनी हे आदेश जारी केले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांना कोणती जबाबदारी मिळणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. नितीन अग्रवाल हे केरळ केडरचे १९८९ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अग्रवाल यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ २०२६ मध्ये पूर्ण होणार होता. (BSF)
वाय. बी. खुरानिया हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते विशेष डीजी (पश्चिम) म्हणून पाकिस्तान सीमेवर सुरक्षा प्रभारी होते. त्यांना ओडिशातील पोलीस महासंचालक (डीजीपी) ची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात वाढत्या घटना पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. आकडेवारीनुसार, या वर्षी २१ जुलैपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये २४ चकमकी आणि ११ दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये १४ नागरिक आणि १४ सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय बांगलादेश सीमेवरील घुसखोरी हेही या निर्णयाचे कारण सांगितले जात आहे.