Amazon Layoff:
जगातील सर्वात मोठी टेक कंपनी अमेझॉन जवळपास ३० हजार कॉर्पोरेट नोकऱ्या कमी करण्याच्या तयारीत आहे. ही प्रक्रिया आजपासूनच (दि. २८ ऑक्टोबर) सुरू होण्याची शक्यता आहे. ज्यावेळी कोरोना काळात मागणी खूप होती त्यावेळी कंपनीनं मोठी हायरिंग केली होती. ती नियंत्रणात आणण्यासाठी आणि खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचं सांगण्यात येत आहे.
जरी हा आकडा दिसताना मोठा दिसत असला तरी अमेझॉनच्या १० लाखापेक्षा जास्त कर्मचारी संख्येच्या तुलनेत हा कमी आहे. मात्र कंपनीमध्ये साडे तीन कॉर्पोरेट कर्मचारी आहेत. त्यांच्याशी या होऊ घातलेल्या ले ऑफची तुलना केली तर ती जवळपास १० टक्के इतकी होते. अमेझॉनने यापूर्वी २०२२ मध्ये सर्वात मोठी नोकरी कपात केली होती. त्यावेळी त्यांनी जवळपास २७ हजार नोकऱ्या कमी केल्या होत्या.
दरम्यान, अमेझॉननं गेल्या दोन वर्षापासूनच कमी संख्येत नोकर कपात करण्यास सुरूवात केली होती. ही कपात वेगवेगळ्या विभागात करण्यात आली. त्यात डिव्हाईस, कम्युनिकेशन आणि पॉडकास्टिंग या विभांगांचा समावेश आहे.
मात्र या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या कपात ही अनेक विभागांवर परिणाम करणारी ठरणार आहे. यात एचआर, तंत्रज्ञान, ऑपरेशन्स, डिव्हाईस आणि सर्व्हिसेस या विभागांचा समावेश आहे. त्याचबरोबर अमेझॉन वेब सर्व्हिसमधील लोकांवर देखील याचा परिणाम होईल असं बोललं जात आहे.
कंपनीनं ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर होणार आहे त्यांच्या मॅनेजर्सना हे त्यांना कशा पद्धतीनं सांगायचं आहे याचं ट्रेनिंग सुरू केलं आहे. नोकर कपातीबाबतचे मेल हे मंगळवारपासून पाठवण्यास सुरूवात होईल असं देखील सांगण्यात येत आहे.
अमेझॉन सीईओ अँडी जेस्सी यांनी या नोकर कपातीत पुढाकार घेतला आहे. यात अधिकारी आणि मॅनेजर्स यांची संख्या कमी करण्यात येणार आहे. जेस्सी यांनी अकार्यक्षम कर्मचारी शोधण्यासाठी एक कम्प्लेंट लाईन सुरू केली होती. त्याच्यावर जवळपास १५०० लोकांनी कॉल केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर ४५० प्रक्रिया बदलण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. जेस्सी यांनी जूनमध्येच आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स टूल्सच्या वाढलेल्या वापरामुळं नोकर कपात होईल असं सांगितलं होतं.