

Montha Cyclone Update:
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोंथा चक्रीवादळानं तीव्र रूप धारण केलं आहे. हे वादळ आज संध्याकाळपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारी भागात पोहचणार आहे. यामुळं आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांना देखील अती दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा परिणाम हा फक्त आंध्र प्रदेश पुरता मर्यादित राहणार नाही तर त्याचा परिणाम हा महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील काही भागातही जाणवणार आहे.
भारतीय हवामान खात्याचे उच्च अधिकारी जीएनआरएस श्रीनिवास राव यांनी सांगितलं की, 'मोंथा चक्रीवादळ मंगळवारी सायंकाळपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकण्याचा अंदाज आहे. याचा प्रभाव हा मछलीपट्टणम आणि कलिंगापट्टणम जवळ जास्त असणार आहेत. यामुळं आंध्र प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतीवृष्टी होण्याचा अंदाज आहे.'
श्रीनिवास राव पुढे म्हणाले की, 'आम्ही आंध्र प्रदेशातील तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पेड्डापल्ली, जयशंकर फुपालपल्ली आणि मुलुगू या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर पूर्वोत्तर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मोंथा वादळाचा सर्वाधिक प्रभाव हा आंध्र प्रदेशमध्ये पडणार असला तरी जेव्हा हे वादळ किनाऱ्यावरून पुढं सरकेल त्यानंतर इतर राज्यांवर देखील याचा परिणाम होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विदर्भात या वादळाचा प्रभाव असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील पूर्व भागातील जिल्ह्यांना याचा विशेष फटका बसणार आहे. इथं पावसाच्या मध्यम सरी कोसळतील अन् सोसाट्याचा वारा देखील सुटेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा आधीच तयार झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथा इथं सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडतोय. त्यातच आचा मोंथा चक्रीवादळाचा देखील परिणाम महाराष्ट्रातील विदर्भावर होणार आहे. त्यामुळं पाऊस अजून काही दिवस तरी राज्यात मुक्काम ठोकून असणार आहे.
२८ आणि २९ ऑक्टोबर नंतर या चक्रीवादळाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.