

गॅन्सव्हिल/फ्लोरिडा : फुफ्फुस किंवा त्वचेच्या (म्हणजे मॅलेनोमा) कर्करोग रुग्णांना कोव्हिड-19 ची लस प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे संशोधन अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा आणि एमडी अँडरसन कॅन्सर सेंटरमधील संशोधकांनी केले आहे. कर्करोगाच्या या रुग्णांना इम्यूनोथेरपी सुरू झाल्यानंतर 100 दिवसांच्या आत कोव्हिड-19 लस दिल्याने त्यांचे आयुष्य वाढल्याचा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.
संशोधकांनी 2019 ते 2023 दरम्यान 1,000 हून अधिक रुग्णांचे रेकॉर्डस् विश्लेषित केले. इम्यूनोथेरपीसह लस घेतलेल्या फुफ्फुस कर्करोग रुग्णांचा मध्यम जीवनकाळ (वयोमान) 20.6 महिन्यांवरून 37.3 महिन्यांपर्यंत वाढले, तर मॅलेनोमा रुग्णांमध्ये 26.7 महिन्यांवरून 30 ते 40 महिन्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली. संशोधकांच्या मते, कोव्हिड-19 लस प्रतिकारशक्ती ‘सक्रिय’ करून ट्यूमरशी लढणार्या पेशींचे काम वाढवते, जसे सामान्यतः विशिष्ट एंटी-कॅन्सर लस करते. माऊस मॉडेल्सवरील प्रयोगांनी दाखवले की, लस नसलेल्या कर्करोगांनाही प्रतिसाद देण्यास लस मदत करते.
संशोधकांच्या मते, हा शोध कर्करोग उपचारात क्रांतिकारी बदल घडवू शकतो. भविष्यात सर्व प्रकारच्या कर्करोगांसाठी सार्वत्रिक, ऑफ-द-शेल्फ लस विकसित करण्याची शक्यता आहे. संशोधनात कोव्हिड-19 व्यतिरिक्त फ्लू किंवा न्यूमोनिया लसींनी जीवनावधीवर परिणाम दर्शवला नाही. आता, या निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी मोठ्या क्लिनिकल ट्रायलची योजना आखण्यात येत आहे. हा अभ्यास राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि इतर फाऊंडेशन्सद्वारे वित्तपुरवठा केला गेला आहे.