नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 'एनसीईआरटी'च्या पुस्तकातून संविधानाची प्रस्तावना काढून टाकल्याच्या आरोपांना ठोस आधार नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले. नवीन शैक्षणिक दृष्टिकोनाचा भाग म्हणून प्रस्तावनेसह मूलभूत कर्तव्ये, मूलभूत हक्क आणि राष्ट्रगीत यासह भारतीय राज्यघटनेच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करत असल्याचे एनसीईआरटीने सांगितले. (NCERT)
इयत्ता तिसरी आणि सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकातून संविधानाची प्रस्तावना वगळ्याच्या आरोपांवर, ‘एक्स’वर पोस्ट करुन एनसीईआरटीने हे स्पष्टीकरण दिले. केवळ प्रस्तावनेतून संविधान आणि घटनात्मक मूल्ये समजतात हा समज संकुचित आहे. मुलभूत कर्तव्ये, मूलभूत हक्क आणि राष्ट्रगीत यातून संविधानिक मूल्ये प्रस्तावनेसह मुलांनी का आत्मसात करू नयेत? असा सवाल एनसीईआरटीने केला. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही या सर्व गोष्टींना समान महत्त्व देत असल्याचेही एनसीईआरटीने सांगितले. (NCERT)
शिक्षणासारख्या विषयाचा खोट्या राजकारणासाठी वापर करणे ही काँग्रेसची घृणास्पद मानसिकता दर्शवत असल्याचा पलटवार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला. मुलांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेला नावबोट ठेवणाऱ्यांनी खोटे पसरवण्याआधी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, असा टोलाही त्यांनी काँग्रेससह विरोधकांना लगावला. (NCERT)
मॅकॉलेच्या विचारसरणीने प्रेरित झालेल्या काँग्रेसला सुरुवातीपासूनच भारताच्या विकासाचा आणि शिक्षण पद्धतीचा तिरस्कार असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने संविधान, संविधानिक मूल्ये आणि नवीन शैक्षणिक धोरण समजून घ्यावे आणि देशातील मुलांच्या नावावर आपले राजकारण करणे थांबवावे, असेही ते म्हणाले.