AISA hunger strike PTI Photo
राष्ट्रीय

AISA hunger strike : तीन विद्यार्थ्यांचे २३ दिवसांनंतर उपोषण मागे; आता सोनम वांगचुक यांच्या भूमिकेकडे लक्ष

आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान AISA देशव्यापी मोहीम राबवणार

पुढारी वृत्तसेवा

AISA hunger strike Jantar Mantar : जंतरमंतर येथे आमरण उपोषणाला बसलेल्या 'ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन'च्या (AISA) तीन विद्यार्थ्यांनी आज दि. (२० जुलै) आपले २३ दिवसांनंतर बेमुदत उपोषण मागे घेतले. विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी, नागरी समाजातील प्रतिनिधी आणि नामांकित व्यक्तींच्या एका शिष्टमंडळाने या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना हे उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. संसदेच्या माध्यमातून आणि सार्वजनिक मोहिमांद्वारे हे आंदोलन पुढे सुरू ठेवावे, असे आवाहन या शिष्टमंडळाने कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार नेहा, मनीष आणि आमीन या 'आयसा'च्या तिन्ही कार्यकर्त्यांनी आपले बेमुदत उपोषण सोडले. आता सर्वांच्या नजरा सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या भूमिकेकडे लागल्या असून, सध्या त्यांच्यावर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विद्यार्थ्यांचे वजन १२ टक्क्यांनी घटले

'आयसा'ने दिलेल्या माहितीनुसार, २३ दिवसांच्या उपोषणामुळे तिन्ही विद्यार्थ्यांचे वजन १२ टक्क्यांहून अधिक घटले होते. रक्तातील साखरेचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळे आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या असतानाही त्यांनी आंदोलन सुरू ठेवले होते. दरम्यान, आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP) विरोधात महिनाभर देशव्यापी मोहीम राबवणार असल्याचे छात्र संघटनेने स्पष्ट केले.

काय होत्या प्रमुख मागण्या?

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची न्यायालयीन चौकशी आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा या प्रमुख मागण्यांसाठी 'आयसा'चे कार्यकर्ते २८ जूनपासून जंतरमंतरवर बेमुदत उपोषणाला बसले होते.

सोनम वांगचुक उपोषण सोडणार?

सरकारने परीक्षांमधील गोंधळाची जबाबदारी स्वीकारल्यास आपण उपोषण मागे घेऊ, असे संकेत सोनम वांगचुक यांनी सोमवारी सकाळी दिले. मात्र, त्यासाठी त्यांनी तीन अटी ठेवल्या असून, खासदारांची भेट आणि त्यांच्या आश्वासनाचा यात समावेश आहे. अद्याप सरकारकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही."मी उपोषण कधी सोडणार, असे अनेकांनी विचारले. सरकारने शिक्षण व्यवस्थेतील अपयश आणि पेपर फुटीसारख्या घटनांची जबाबदारी २० जुलैपर्यंत स्वीकारली, तर मी उपोषण मागे घेईन, असे मी आधीच समर्थकांना सांगितले होते," असे वांगचुक यांनी स्पष्ट केले.

खासदारांनी रुग्णालयात येऊन मला हे आश्वासन द्यावे : वांगचुक

आंदोलक संसदेपर्यंत पोहोचले आणि विविध राजकीय पक्षांच्या खासदारांनी हा मुद्दा संसदेत मांडण्याचे आश्वासन दिले, तरीही आपण उपोषण सोडू, असे वांगचुक म्हणाले. "माझी तब्येत खालावल्यामुळे मला संसदेपर्यंत जाता आले नाही, तर विविध पक्षांच्या आदरणीय खासदारांनी रुग्णालयात येऊन मला हे आश्वासन द्यावे," अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, आपल्याला सफदरजंग रुग्णालयात बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आल्याचा आरोपही वांगचुक यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT