Air India Plane Crash
अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा २७४ वर पोहोचला आहे. विमान दुर्घटनेच्या घटनास्थळी ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. एआय १७१ विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. शुक्रवारी बचाव आणि मदत पथकांनी बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमानाच्या ढिगाऱ्यातून २९ मृतदेह बाहेर काढले. यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा २७४ झाला आहे, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्स मिळून २४१ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. आता मृतांच्या वाढत्या संख्येवरून असे दिसून येते की उर्वरित ३३ बळी हे अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमधील असलेले लोक असावेत. ज्या ठिकाणी विमान कोसळले. यात डॉक्टर, विद्यार्थी, रुग्णालयाचे कर्मचारी आणि मेघानी नगर परिसरातील स्थानिक नागरिक रहिवासी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
बीजे मेडिकल कॉलेज कॅम्पसमधील युजी आणि पीजी विद्यार्थ्यांच्या वसतीगृह इमारतीच्या छतावर फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) असलेला ब्लॅक बॉक्स सापडला, अशी माहिती सहपोलिस आयुक्त नीरज बडगुजर यांनी दिली. गुरुवारी रात्री विमानाचा इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर सापडला होता.
नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्याचे सांगितले. हा ब्लॅक बॉक्स विमान अपघाताचे कारण शोधण्यात महत्त्वाचा ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
मेडिकल कॉलेजची कॅम्पस इमारत आणि जवळपासच्या परिसरात शोध मोहीम सुरु आहे. या दुर्घटनेतील मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जात असून त्यासाठी नमुने पाठवण्यात आले आहे, असे राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
शुक्रवारी एमबीबीएसचा विद्यार्थी असलेले जय प्रकाश चौधरी यांची ओळख पटली. ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. शुक्रवारी त्याच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह ओळखला.