

नवी दिल्ली : अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानांची वाढीव सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले. यासंबंधीचे परिपत्रक डीजीसीएने शुक्रवारी जारी केले. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाच्या ताफ्यात २६ बोईंग ७८७-८ आणि ७ बोईंग ७८७-९ आहेत. या सर्व विमानांच्या वाढीव सुरक्षा तपासणी १५ जूनपासून केली जाणार आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाला जेनेक्स इंजिनने सुसज्ज असलेल्या त्यांच्या बोईंग ७८७-८ आणि ७८७-९ विमानांवर तात्काळ अतिरिक्त देखभालीची कारवाई करण्याचे निर्देश दिले. संबंधित डीजीसीए प्रादेशिक कार्यालयांशी समन्वय साधून ही कारवाई केली जाईल, असे पत्रकात म्हटले.
· १५.०६.२०२५ पासून भारतातून उड्डाण करण्यापूर्वी विमानाची एकदा तपासणी करावी.
· इंधन देखरेख आणि संबंधित प्रणालीची तपासणी झाली पाहिजे.
· केबिन एअर कॉम्प्रेसर आणि संबंधित प्रणालीची तपासणी.
· इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण- प्रणाली तपासणी.
· इंजिन इंधन चालित अॅक्चुएटर-ऑपरेशनल तपासणी.
· हायड्रॉलिक सिस्टमची सेवाक्षमता तपासणी.
· टेक-ऑफ पॅरामीटर्सचा आढावा.
· पुढील सूचना येईपर्यंत ट्रान्झिट तपासणीमध्ये 'फ्लाइट कंट्रोल तपासणी' सुरू केली जाईल.
· दोन आठवड्यांच्या आत वीज हमी तपासणी केली जाईल.