Air India Flight Emergency Landing Jaipur : जर्मनीतील फ्रँकफर्टहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान जयपूरमध्ये आपत्कालीन स्थितीत (इमर्जन्सी लँडिंग) उतरवण्यात आले. विमान हायजॅक झाल्याच्या संशयावरून हे पाऊल उचलण्यात आले. वैमानिकाने 'एअर ट्रॅफिक कंट्रोल'ला (ATC) अपहरणप्रसंगी वापरला जाणारा विशिष्ट संकेत (कोड) पाठवला होता.
एअर इंडियाचे AI2030 हे विमान जर्मनीतील फ्रँकफर्टहून दिल्लीसाठी निघाले होते. भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर विमान हायजॅक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने चिंता व्यक्त केली गेली. या धोक्याच्या सूचनेनंतर, दिल्लीऐवजी जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंगसाठी विमानाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान जयपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.
लँडिंगनंतर, सुरक्षा यंत्रणांना तपासणी करता यावी यासाठी विमान विमानतळावरील एका 'आयसोलेशन बे'मध्ये (विलगीकरण क्षेत्रात) हलवण्यात आले. अधिकाऱ्यांनी विमानात प्रवेश करून तपास सुरू केला. हायजॅक संकेत का पाठवला गेला आणि विमानात खरोखरच काही संशयास्पद परिस्थिती होती का, याचा शोध आता घेतला जात आहे. लँडिंगपूर्वी विमानतळावरील हालचाली वाढल्या होत्या आणि सर्व सुरक्षा व्यवस्था सज्ज करण्यात आली होती.
वृत्तसंस्था एएनआय (ANI) नुसार, अहमदाबाद एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) विमानाकडून आपत्कालीन संकेत मिळाले. वैमानिकाने '7500' हा कोड पाठवल्याचे समजते. बेकायदेशीर हस्तक्षेप किंवा अपहरणाच्या प्रसंगी हा कोड वापरला जातो. संदेश मिळताच काही सेकंदातच आपत्कालीन कार्यपद्धती (प्रोटोकॉल) कार्यान्वित करण्यात आली आणि विमानाचा मार्ग जयपूरकडे वळवण्यात आला.
विमान उतरल्यानंतर, कडक सुरक्षेत दोन्ही वैमानिक आणि सर्व प्रवाशांना एकामागून एक सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवासी आणि त्यांच्या सामानाची तपासणी सुरू करण्यात आली. विमानतळावर दहशतवादविरोधी पथकालाही तैनात करण्यात आले होते. विमानाचा परिसर रिकामा करून तो सील करण्यात आला, तर दिल्लीत एनएसजी (NSG) पथकाला 'स्टँडबाय'वर ठेवण्यात आले होते.