नवी दिल्ली : देशासह जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर, मागणीच्या तुलनेत मनुष्यबळाची कमी उपलब्धता, यामुळे नवोदितांनादेखील ९ ते १५ लाखांचे पॅकेज मिळत आहे. तर, सायबर सुरक्षा क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचे वार्षिक पॅकेज एक कोटीच्या घरात गेल्याची माहिती समोर आली आहे.
‘फाऊंडइट इनसाईटस् ट्रॅकर'च्या (एफआयटी) ताज्या अहवालानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील वेतनात वार्षिक १२ टक्के वाढ झाली आहे. सर्व श्रेणींमध्ये ही वाढ सर्वाधिक आहे. त्यानंतर कॉम्प्युटर आणि नेटवर्क सुरक्षा तसेच सेमीकंडक्टर क्षेत्रांचा क्रमांक लागतो, जिथे प्रत्येकी ९ टक्के वाढ झाली आहे.
माहिती-तंत्रज्ञान (आयटी) आणि आयटी सेवा क्षेत्रात सुरुवातीचे वेतन वार्षिक २.६८ लाख ते ५.०८ लाख रुपये असते. एआय क्षेत्रातील नवोदितांना मिळणाऱ्या वेतनाच्या साधारणपणे एकतृतीयांश आहे. तर, १५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्यांसाठी हे वेतन वार्षिक ५७.५५ लाख ते ७२.१३ लाख रुपयांपर्यंत पोहोचते. हे वेतन वरिष्ठ एआय व्यावसायिकांच्या वेतनाच्या कमाल मर्यादेपेक्षा खूपच कमी आहे. अहवालानुसार गेल्या वर्षभरात या दोन्ही श्रेणींमधील वेतनात १ टक्क्याची घट झाली आहे.
आयटी क्षेत्रांतर्गत वेतनवाढीमध्ये स्पष्ट तफावत दिसून येत आहे. एआयमध्ये १२ टक्के, संगणक आणि नेटवर्क सुरक्षेत ९ टक्के, तर डेटा मायनिंगमध्ये ७ टक्के वेतनवाढ झाली आहे. संगणक सॉफ्टवेअर आणि संगणक नेटवर्किंग या क्षेत्रांनी प्रत्येकी १ टक्क्याची किरकोळ वाढ नोंदवली. याउलट गेल्या वर्षभरात आयटी क्षेत्रात १ टक्क्याची घट झाली. तसेच, इंटरनेट क्षेत्रातील वेतनात २ टक्के, ई-कॉमर्समध्ये ३ टक्के आणि संगणक हार्डवेअरमध्ये ४ टक्क्यांची घट दिसून आली.
शून्य ते तीन वर्षांचा अनुभव असलेल्या एआय व्यावसायिकांसाठी करिअरच्या सुरुवातीलाच ‘प्रीमियम’ वेतन मिळत आहे. त्यांचे वार्षिक वेतन ८.८७ लाख ते १५.४१ लाख रुपयांदरम्यान असते. तर, १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्यांसाठी हे वेतन वार्षिक ७०.९९ लाख ते ८९.२४ लाख रुपयांपर्यंत पोहोचते. सायबर सुरक्षा क्षेत्रात वेतनाची कमाल मर्यादा वार्षिक ९७.८१ लाख रुपये इतकी उच्च आहे. देशात २०२४ ते २०२६ या काळात एआय क्षेत्रातील वेतनात २३ टक्क्यांची वाढ झाली आहे. याउलट कॉम्प्युटर हार्डवेअर आणि ई-कॉमर्ससारख्या क्षेत्रांतील वेतनात घट झाली असून आयटी सेवा क्षेत्र वेतन गेल्या दोन वर्षांत स्थिर राहिले आहे.