AI content government guidelines
नवी दिल्ली : डिजिटल विश्वातील पारदर्शकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने आज (दि. १०) मोठा निर्णय घेतला. आता यापुढे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील एआय-निर्मित (AI-generated) मजकुरावर स्पष्टपणे 'लेबल' किंवा 'वॉटरमार्क' लावणे अनिवार्य असेल. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर तक्रार प्राप्त झाल्यापासून केवळ ३ तासांच्या आत हटवणे बंधनकारक असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी नियम बनवले असून, माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) सुधारणा नियम, २०२६ २० फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणार आहेत.
सरकारने स्पष्ट केले आहे की, एकदा का एखाद्या मजकुरावर एआय लेबल किंवा मेटा डेटा लावल्यानंतर तो कोणालाही हटवता येणार नाही किंवा लपवता येणार नाही. यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ, फोटो किंवा ग्राफिक्स अशा सर्व डिजिटल स्वरूपातील सामग्रीचा समावेश असेल, जी संगणक किंवा इतर संसाधनांच्या मदतीने तयार किंवा सुधारित (Modify) केली गेली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी हे सुनिश्चित करावे की कोणताही वापरकर्ता या सुविधेचा गैरवापर करणार नाही. एखादा युजर बेकायदेशीर, अश्लील, फसवणूक करणारी किंवा बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री तयार किंवा शेअर करत असेल, तर ती रोखण्यासाठी प्लॅटफॉर्म्सनी स्वयंचलित (Automated) तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.
माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियमावलीत सुधारणा करून सरकारने हे पाऊल उचलले आहे. यानुसार एआय उपकरणांच्या मदतीने तयार केलेला कोणताही मजकूर प्लॅटफॉर्मवर स्पष्टपणे आणि ठळकपणे लेबल केलेला असावा.
बेकायदेशीर किंवा हानिकारक श्रेणीतील मजकूर काढून टाकण्यासाठी कंपन्यांना आता केवळ ३ तासांची मुदत दिली जाईल.सोशल मीडिया कंपन्यांना वापरकर्त्यांच्या घोषणांची शहानिशा करण्यासाठी विशेष साधने आणि पडताळणी यंत्रणा विकसित करावी लागेल.
मजकुराची योग्य माहिती न देता तो प्रसिद्ध झाल्यास, त्यास संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जबाबदार धरले जाईल. एआय आणि डीपफेकचा होणारा गैरवापर रोखणे आणि हानिकारक किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर जलद गतीने कारवाई करणे, हा या नव्या नियमांचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.