AI heart disease app file photo
राष्ट्रीय

AI heart disease app: फक्त 7 सेकंदांत होणार हृदयविकाराचे निदान! 14 वर्षांच्या मुलाने बनवले 'AI ॲप'

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंगचा वापर करून एक ॲप तयार केले आहे, जे केवळ सात सेकंदांमध्ये तुमच्या हृदयाच्या आरोग्याची माहिती देऊ शकते.

मोहन कारंडे

AI heart disease app

आंध्र प्रदेश : जगभरात हृदयविकाराच्या समस्येने बळी पडणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेत राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या एका 14 वर्षांच्या मुलाने मोठे यश संपादन केले आहे. या किशोरवयीन मुलाचे नाव आहे सिद्धार्थ नंद्याला. त्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंगचा वापर करून एक असे ॲप तयार केले आहे, जे केवळ सात सेकंदांमध्ये तुमच्या हृदयाच्या आरोग्याची माहिती देऊ शकते.

ज्या वयात मुले खेळण्या-बागडण्यात आणि अभ्यासात गुंतलेली असतात, त्याच वयात सिद्धार्थने आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी शोध लावला आहे. त्याने विकसित केलेले हे ॲप मोबाईलला छातीजवळ ठेवून हृदयाचे ठोके रेकॉर्ड करते आणि त्यानंतर लगेच 7 सेकंदांत हृदयाचे ठोके सामान्य आहेत की नाही, याचा अहवाल सादर करते.

ॲपची अचूकता आणि चाचणी

या ॲपमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि नॉइस-कॅन्सलेशन तंत्रज्ञानाचा समावेश आहे, ज्यामुळे गोंगाटातही अचूक परिणाम मिळतात.

सिद्धार्थच्या ॲपची चाचणी भारतात गुंटूर गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटलमध्ये सुमारे 700 रुग्णांवर घेण्यात आली.या चाचण्यांमध्ये ॲपने 96 टक्क्यांहून अधिक अचूकता दर्शवली आहे. अमेरिकेतही 15,000 हून अधिक रुग्णांवर या ॲपची चाचणी झाली आहे.

मुख्यमंत्री नायडूंकडून अभिनंदन

सिद्धार्थच्या या अभूतपूर्व यशामुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे. नायडू यांनी हेल्थकेअर तंत्रज्ञानातील त्याच्या योगदानाबद्दल अभिनंदन केले आणि हा शोध लाखो लोकांसाठी वरदान ठरू शकतो, अशी आशा व्यक्त केली.

हृदयविकाराचे वाढते प्रमाण

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अहवालानुसार, अमेरिकेत जवळजवळ 48 टक्के प्रौढांना म्हणजेच 121.5 दशलक्ष लोकांना विविध प्रकारचा हृदयविकार आहे. जगात सुमारे 32% लोकांचा मृत्यू हृदयविकारांमुळे होतो, ज्यामुळे या ॲपचे महत्त्व वाढणार आहे.

विशेष म्हणजे, हे सिद्धार्थचे पहिलेच संशोधन नाही. यापूर्वी त्याने कमी खर्चात तयार होणारी एक कृत्रिम भुजा डिझाइन केली होती. तसेच, त्याने विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान किट बनवणारी 'STEM IT' नावाची एक स्टार्टअप कंपनीही सुरू केली आहे. त्याच्या या कामाबद्दल त्याला तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडूनही अभिनंदन पत्र मिळाले होते. सध्या सिद्धार्थ टेक्सासमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT