

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताच्या बेरोजगारी दरात गेल्या सहा वर्षांत लक्षणीय घट झाली आहे, ज्यामुळे कामगार बाजाराच्या परिस्थितीत संरचनात्मक सुधारणा झाल्याचे दिसून येते. नवीनतम वार्षिक नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणानुसार, 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील व्यक्तींसाठी सर्वसाधारण स्थितीनुसार बेरोजगारीचा दर 2017-18 मधील 6.0 टक्क्यांवरून 2023-24 मध्ये 3.2 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जानेवारी 2025 पासून त्यात बदल केले असून, चालू साप्ताहिक स्थितीवर आधारित मासिक अंदाज सादर केले आहेत. बेरोजगारीचा दर ऑगस्ट 2025 मध्ये 5.1 टक्के आणि सप्टेंबर 2025 मध्ये 5.2 टक्के होता. या दोन महिन्यांत ग्रामीण बेरोजगारी अनुक्रमे 4.3 टक्के आणि 4.6 टक्के होती, तर शहरी बेरोजगारी 6.7 टक्के आणि 6.8 टक्के या उच्च स्तरावर होती. ‘वाढलेली वारंवारता आणि हंगामी बदलांमुळे मासिक गुणोत्तरांमध्ये बदल अपेक्षित आहेत; परंतु ते दीर्घकालीन कल दर्शवत नाहीत,’ असे श्रम मंत्रालयाने म्हटले आहे. ‘रोजगारनिर्मितीसोबतच रोजगारक्षमता सुधारणे हे सरकारचे प्राधान्य आहे. त्यानुसार, सरकार देशात ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वांच्या सहभागाला चालना देण्यासाठी विविध रोजगारनिर्मिती योजना/कार्यक्रम राबवत आहे.
महाराष्ट्रातही लक्षणीय घट
महाराष्ट्रामध्येही गेल्या सहा वर्षांत बेरोजगारी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सर्वसाधारण स्थितीनुसार बेरोजगारीचा दर 2017-18 मधील 4.8% वरून 2023-24 मध्ये 3.3% पर्यंत घसरला आहे. या कालावधीत ग्रामीण बेरोजगारी 3.2% वरून 2.1% पर्यंत कमी झाली, तर शहरी बेरोजगारी 7.4% वरून 5.2% पर्यंत कमी झाली.