

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने (डीओटी) सर्व प्रमुख स्मार्टफोन उत्पादकांना देशात विकल्या जाणार्या प्रत्येक नवीन डिव्हाईसवर त्यांचे अधिकृत सायबरसुरक्षा अॅप संचार साथी प्रीलोड करणे बंधनकारक केले आहे.
अॅप लोड करण्यासाठी अॅपल, सॅमसंग, विवो, ओप्पो आणि शाओमीसारख्या मोबाईल कंपन्यांना 90 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. जुन्या फोनवर सॉफ्टवेअर अपडेटद्वारे हे अॅप इन्स्टॉल केले जाईल. या अॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनवरील कॉलद्वारे होणारी फसवणूक टाळता येणार असल्याचा दावा दूरसंचार विभागाने केला आहे. या विभागाने 17 जानेवारी 2025 रोजी हे अॅप लाँच केले.
या अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत चोरीला गेलेले सात लाखांवर हँडसेट मिळविण्यात यश मिळाले आहे. आता भारतात आयात होणार्या किंवा उत्पादित होणार्या स्मार्टफोनमध्ये संचार साथी अॅप प्रीलोड करण्यामुळे वापरकर्त्यांना चांगलाच फायदा होणार आहे, असे दूरसंचार विभागाचे म्हणणे आहे. अॅप प्रीलोड करण्यासाठी सरकारने खासगीरीत्या कंपन्यांना कळवले आहे. त्यामुळे नव्या हँडसेटमध्ये संचार साथी बिल्ट इन असेल. जर तुमच्याकडे आधीच रिटेल सप्लाय चेनमध्ये फोन असेल तर अॅप (ओव्हर द एअर) अपडेटद्वारे येऊ शकते.
संचार साथी हे मोबाईल वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यास मदत करण्यासाठी डिझाईन केलेले आहे.
फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तो ब्लॉक करता येतो.
फ्रॉड किंवा संशयास्पद कॉलची तक्रार करता येते.
चोरीला गेलेला फोन सेंट्रल रजिस्ट्रीद्वारे ट्रॅक करता येईल.
प्रत्येक मोबाईल फोनमध्ये 14 ते 17 अंकी आयएमईआय नंबर असतो. चोरीला गेलेले फोन ब्लॉक करण्यासाठी तो वापरला जातो. संचार साथी अॅप याच आयएमईआय नंबरच्या मदतीने चोरीला गेलेले फोन ट्रॅक करण्यास आणि ब्लॉक करण्यास मदत करते. हे अॅप गुन्ह्यांमध्ये सामील असलेले फोन शोधण्यातही मदत करते.