Crime News
अहमदाबाद: जेवणात बनवलेल्या भाजीवरून पती-पत्नीमधील वाद जीवघेणा ठरला. अहमदाबादच्या नरोडा भागात एका महिलेने आपल्या निवृत्त लष्करी पतीच्या छातीत स्वयंपाकघरातील सुरी खुपसून त्याची हत्या केली. याप्रकरणी नरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरोडा स्मार्ट सिटी-२ परिसरात ही घटना घडली. नरोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एम. कटारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दांपत्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सतत भांडणे होत होती. घटनेच्या रात्री पती घरी परतल्यानंतर जेवायला बसला होता. मात्र, ताटात वाढलेली भाजी आवडली नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, भाजीवरून सुरू झालेला वाद हळूहळू विकोपाला गेला. रागाच्या भरात दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पतीने पत्नीला मारहाण केली. या घटनेने संतप्त झालेल्या पत्नीने थेट स्वयंपाकघरात जाऊन भाजी कापायचा चाकू आणला आणि पतीच्या छातीवर डाव्या बाजूला वार केला.
हा वार इतका वर्मी लागला की, अत्यंत गंभीर दुखापत झाल्यामुळे पतीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि महिलेला अटक केली.
या प्रकरणात अनैतिक संबंधांसारखा काही प्रकार आहे का, या अंगानेही पोलिसांनी तपास केला होता. मात्र, प्राथमिक तपासात असा कोणताही संशयास्पद प्रकार समोर आलेला नाही, असे पोलीस निरीक्षक बी. एम. कटारिया यांनी स्पष्ट केले. सततच्या घरगुती वादातून आणि घटनेच्या वेळी अनावर झालेल्या तीव्र रागातूनच हे कृत्य घडल्याचे पोलिसांनी सांगितले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.