Pilots' association objects to inquiry report into Ahmedabad plane crash
नवी दिल्ली : अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ अपघातप्रकरणी प्राथमिक तपास झाला आहे. यामध्ये एक वैमानिक दुसऱ्याला 'इंधन पुरवठा का बंद केला?' असे विचारताना ऐकू येत आहे. त्यावर दुसऱ्या वैमानिकाने 'मी नाही केले' असे उत्तर दिले.अशा प्रकारचे संभाषण झाल्याचे समोर आले आहे.
एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (AAIB) तपासानंतर प्राथमिक अहवाल दिला आहे. पण त्यामुळे यावरुन निष्कर्ष काढून वैमानिंकामध्ये झालेले संभाषण या अपघातासाठी गृहीत धरू नये असे, एअरलाईन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने (ALPA) म्हटले आहे. त्यांनी या बोईंग ७८७ प्रकारच्या व AI 171 या क्रमांकाच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबात ALPA ने म्हटले आहे की, "अहवालातील एकून माहिती आणि चौकशीची दिशा ही पायलटच्या चुकीकडे झुकते आहे. त्यामुळे या अहवालामुळे तयार होत असलेले संशयास्पद पूर्वग्रह स्पष्टपणे फेटाळतो आणि आम्ही निष्पक्ष चौकशीची मागणी करतो." असे त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पुढे पायलट संघटनेने संघटनेने अहवाल मीडियामध्ये लीक झाल्याबद्दलही आक्षेप नोंदवले असून, अहवाल कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याच्या सहीशिवाय वा अधिकृत स्रोताशिवाय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला. चौकशीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून, यामुळे या चौकशीच्या प्रक्रियेवरील विश्वासार्हतेला तडा जातो, असेही म्हटले आहे.
याशिवाय, या अपघाताच्या चौकशी प्रक्रियेत आवश्यक आणि अनुभवी व्यक्तींना, विशेषतः विमान चालवणाऱ्या लाईन पायलट्सना सहभागी करण्यात आलेले नाही, योग्य पात्रता आणि अनुभव असलेले कर्मचारी, विशेषतः लाईन पायलट्स अजूनही चौकशी समितीत सामील नाहीत असे असा आरोप ALPA ने केला आहे.
दरम्यान अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा अहवाल केवळ प्राथमिक स्वरूपाचा असून, अंतिम निष्कर्ष येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढण्याची घाई करू नये, असे आवाहन नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज (दि. १२ जुलै) शनिवारी केले तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही सांगितले की, वैमानिकांमधील संवाद अत्यंत संक्षिप्त असल्याने केवळ त्यांच्या बोलण्याच्या आधारावर कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही.