नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी ग्रुपने दोन सिमेंट कंपन्यांच्या खरेदीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी जागतिक बँकांकडून २.५ अब्ज (२३,७८२ कोटींहून अधिक भारतीय रुपये) डॉलर्स उभारण्याची योजना तयार केली आहे. हे या वर्षातील भारतातील सर्वात मोठे विदेशी कर्ज असेल. ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालात सूत्रांनी हा दावा केला आहे.
अदानी कुटुंबाची मॉरिशसआधारित कंपनी ‘एंडेव्हर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड’ एका ‘ब्रिज लोन’द्वारे १.५ अब्ज डॉलर्स उभारण्याची योजना आखत आहे. या कर्जाचा कालावधी १८ ते २४ महिन्यांचा असेल. खासगी माहितीवर चर्चा होत असल्याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकांनी ही माहिती दिली.
सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनी विदेशातून घेत असलेल्या सुरुवातीच्या कर्जावर अमेरिकेच्या मानक दरापेक्षा (एसओएफआर) १.५ टक्के जास्त व्याज लागेल. तथापि, ही तात्पुरती व्यवस्था (ब्रिज लोन) आहे. काही काळानंतर, कंपनी हे विदेशी कर्ज फेडण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि एचडीएफसी बँकेकडून रुपयांत नवीन कर्ज घेईल.
याशिवाय, समूहाची दुसरी कौटुंबिक मालकीची कंपनी ‘अदानी इन्फ्रा (इंडिया) लिमिटेड’, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ‘एक्सटर्नल कमर्शियल बॉरोईंग’ (ईसीबी) खिडकीचा वापर करून पाच वर्षांच्या कर्जाच्या माध्यमातून सुमारे १ अब्ज डॉलर्स उभारण्याचा प्रयत्न करत आहे. सूत्रांनुसार, ही सुविधा ‘एसओएफआर’पेक्षा सुमारे २७५ बेसिस पॉईंटस् अधिक दराने उपलब्ध होऊ शकते.
‘ब्लूमबर्ग’च्या माहितीनुसार, हा व्यवहार पूर्ण झाल्यास हे या वर्षातील भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे परदेशी कर्ज ठरेल. ही रक्कम अदानी कॉनेक्स प्रा. लि.च्या १.१३ अब्ज डॉलर्सच्या कर्जापेक्षाही मोठी असेल.