Delhi Police Action at CJP Protest: दिल्लीतील जंतर-मंतर परिसर सकाळपासून आंदोलनाच्या घोषणांनी दणाणून गेला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात देशभरातून आलेले युवक, विद्यार्थी आणि समर्थक सहभागी झाले आहेत. मात्र, शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनात काही लोक घुसले होते.
‘जय श्री राम’च्या घोषणा देत काही जणांनी आंदोलनस्थळाच्या दिशेने कूच करत जंतर-मंतर परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या गटाने आंदोलनाला विरोध दर्शवत घोषणाबाजी केली. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन घटनास्थळी तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि संबंधितांना ताब्यात घेत परिसरातून बाहेर काढले.
दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके यांनी सकाळीच समर्थकांना शांततेचा संदेश दिला होता. आंदोलनाला येताना प्रत्येकाने हातात एक पुस्तक आणि तिरंगा घ्यावा, तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना आदराचे प्रतीक म्हणून फुले द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले होते. हे आंदोलन प्रेम, संवाद आणि लोकशाहीच्या चौकटीत राहून पुढे नेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला होता.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. नवी दिल्ली परिसरात जवळपास दोन हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानांबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, या आंदोलनाला रोखण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यामुळे आंदोलनाच्या मार्गातील कायदेशीर अडथळा दूर झाला आणि आयोजकांना नियोजित कार्यक्रम पुढे नेता आला.
‘कॉकरोच जनता पार्टी’ ही चळवळ सोशल मीडियावर सुरू झाली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान केलेल्या टिप्पणीवरून ही मोहीम चर्चेत आली होती. त्यानंतर सोशल मीडियावर वेगाने वाढलेल्या या चळवळीने लाखो तरुणांना जोडले आहे.
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावत पाठिंबा दर्शवला. लोकशाहीत अशा शांततापूर्ण आणि सर्जनशील आंदोलनांना जागा मिळायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दिवसभर घोषणाबाजी, भाषणे आणि विविध मागण्यांवर चर्चा सुरू असताना पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. काही काळ निर्माण झालेला तणाव वगळता आंदोलन शांततेत सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.