Abishek Porel Case : आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा यष्टीरक्षक, फलंदाज अभिषेक पोरेलच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने बलात्काराच्या प्रकरणात पोरेलसह दोन जणांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, तक्रारदार तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ इतरांना शेअर केले जाऊ नयेत, यासाठी मोगरा पोलिसांना पोरेलचे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा (इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस) ताबा घेण्याचे निर्देश दिले आहेत.
पोरेलवर एका वैद्यकीय (मेडिकल) विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, पोरेलने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्यांचे वैयक्तिक क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले. २३ वर्षीय पोरेल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाकडून खेळतो. त्याने आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी चार सामने खेळले होते. तसेच तो अंतर्गत घरगुती क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करतो.
उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, "६ जुलै २०२६ च्या पोलीस अहवालानुसार याचिकाकर्त्याकडून पेन ड्राईव्ह/स्टोरेज डिव्हाइस जप्त करण्यात आले असून त्यात काही डेटा आहे. अशा परिस्थितीत डेटा इतरांशी शेअर केला जाऊ नये म्हणून आरोपींना पकडणे आणि इलेक्ट्रॉनिक साधने जप्त करणे अत्यंत गरजेचे आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना पकडण्यासाठी काय पावले उचलली हे सांगितले आहे, परंतु त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातात की, त्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि इलेक्ट्रॉनिक साधने जप्त करावीत."
रिपोर्टनुसार, पोरेलने जानेवारी २०२३ मध्ये या विद्यार्थिनीशी संपर्क साधला होता. यानंतर त्यांच्यात संभाषण सुरू झाले. विद्यार्थिनीचे आई-वडील बाहेर असताना तो तिला मानकुंडू येथील आपल्या फ्लॅटवर घेऊन गेला, असा त्याच्यावर आरोप आहे. तक्रारदार महिलेने आरोप केला आहे की, पोरेलने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. नंतर दोन्ही कुटुंबांनी लग्नाबाबत चर्चाही केली होती. या विद्यार्थिनीने गेल्या महिन्यात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार, महिलेने आरोप केला आहे की, दोघांचे गेल्या तीन वर्षांपासून संबंध होते. मात्र गेल्या वर्षी त्यांच्यात मतभेद झाले. त्यानंतर पोरेलने तिच्यापासून 'अंतर' ठेवण्यास सुरुवात केली. पोरेलने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते, परंतु आता तो लग्नास तयार नाही. तसेच, लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, मारहाण केली आणि गुन्हेगारी स्वरूपाची धमकी दिली, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोरेलने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.