तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सोनारपूरमध्‍ये स्थानिक लोकांनी मारहाण केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार घडला.  Pudhari
राष्ट्रीय

Abhishek Banerjee |ममता बॅनर्जी यांचे पुतणे, खासदार अभिषेक बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; जमावाने दगडफेक, मारहाण केल्याचा आरोप

Abhishek Banerjee beaten in Sonarpur | 'चोर' घोषणा देत अंडीही फेकली

पुढारी वृत्तसेवा

Abhishek Banerjee beaten in Sonarpur

कोलकाता: पश्‍चिम बंगालच्‍या माजी मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार अभिषेक बॅनर्जी यांना आज ( दि ३०) पश्चिम बंगालमधील सोनारपूर दक्षिण येथे मारहाण करण्यात आली. तसेच अंडी व दगडफेक करण्यात आली. ते निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसेतील पीडित कुटुंबांची भेट घेण्यासाठी गेले होते, तेव्हा हा धक्‍कादायक प्रकार घडला.

सारे काही भाजप पुरस्‍कृत : अभिषेक बॅनर्जी यांचा आरोप

व्‍हिडिओमध्‍ये राज्यात निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचाराचा फटका बसलेल्या पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी गेलेल्या ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक बॅनर्जी (ज्यांनी क्रिकेट हेल्मेट घातले होते) यांना अनेक स्थानिक लोक अडवून मारहाण करताना दिसत आहेत. स्थानिकांच्या या तीव्र रोषाला सामोरे गेल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिषेक बॅनर्जी यांनी आरोप केला की, "हे सर्व भाजप पुरस्कृत आहे. त्यांनी काय केले आहे ते पहा. त्यांच्या लोकशाहीचे हे उदाहरण आहे. अजून एक महिनाही झाला नाही, आणि पोलीस कुठेच दिसत नाहीयेत."

'त्यांना मला जीवे मारायचे होते'

अचानक घडलेल्‍या घटनेनंवर प्रतिक्रिया देताना अभिषेक बॅनर्जी अत्यंत घाबरलेले दिसत होते. त्यांचा शर्टही फाटलेला होता. या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "हा सगळा भाजप पुरस्कृत हल्ला आहे. त्यांनी काय केले आहे ते पहा. हेच त्यांचे लोकशाहीचे उदाहरण आहे का? निवडणूक होऊन महिनाही झाला नाही, आणि पोलीस कुठेच दिसत नाहीत. त्यांना मला जीवे मारायचे होते... ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आम्ही याबद्दल उच्च न्यायालयाला नक्कीच माहिती देऊ. तसेच राज्यपालांनाही या घटनेची कल्पना दिली जाईल... मी याविरोधात नक्कीच न्यायालयात जाईन."

'चोर' घोषणा देत अंडीही फेकली

या हाय-व्होल्टेज ड्राम्यादरम्यान अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात 'चोर' अशा घोषणा देण्यात आल्या, तसेच त्यांच्यावर अंडीही फेकण्यात आली.'पीटीआय' (PTI) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केलेला आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये, निवडणूक निकालानंतरच्या हिंसाचारात ठार झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेटायला गेलेल्या अभिषेक बॅनर्जी यांच्यावर महिला अंडी फेकत असल्याचे आणि त्यांना 'चोर' म्हणत असल्याचे दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच सोनारपूर दौर्‍यावर

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर २६ दिवसांनी अभिषेक बॅनर्जी पहिल्यांदाच अशा प्रकारे जाहीरपणे लोकांसमोर आले होते. सोनारपूर दक्षिण आणि बेलेघाटा येथे निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसेचा बळी ठरलेल्या इतर पक्ष कार्यकर्त्यांच्या कुटुंबांनाही ते भेटणार होते.

'मी घाबरणाऱ्यांपैकी नाही'

नोटीस मिळाल्यानंतर बोलताना बॅनर्जी म्हणाले की, "मी अजून नोटीस सविस्तर वाचलेली नाही. मी माझ्या वकिलांशी चर्चा करेन आणि योग्य ते उत्तर देईन. मी तपासात शक्य त्या सर्व प्रकारे नक्कीच सहकार्य करेन. त्यांना (भाजप सरकारला) करायचे आहे ते करू देत. आधी फक्त ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) माझ्या मागे होत्या, आता बंगाल पोलीस, कोलकाता पोलीस आणि केएमसी (कोलकाता महानगरपालिका) देखील यात सामील झाले आहेत. आधी २-३ तपास यंत्रणा होत्या, आता ५ झाल्या आहेत. माझ्या मागे ५-६ यंत्रणा लावून मला ब्लॅकमेल करता येईल आणि मी घाबरून गप्प बसेन असे त्यांना वाटतेय, पण मी तसा माणूस नाही."

सीआयडीचे समन्स आणि राजकीय तणाव

पश्चिम बंगाल सीआयडीने (CID) अभिषेक बॅनर्जी यांना कोलकाता येथील 'भवानी भवन' या मुख्यालयात १ जून रोजी दुपारी १२ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. या नोटीसनंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाल्याने राज्यातील राजकीय तणाव आणखी वाढला आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की, विविध तपास यंत्रणांचा वापर करून त्यांना लक्ष्य केले जात आहे. मात्र, आपण तपास यंत्रणांना सहकार्य करू आणि आपली राजकीय कामेही सुरूच ठेवू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.हे समन्स सीआयडीच्या एका चौकशीशी संबंधित आहे. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शोभनदेब चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेते पदासाठी पाठिंबा देणाऱ्या एका पत्रावर तृणमूल आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. हे पत्र पश्चिम बंगाल विधानसभा सचिवालयाला सादर करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT