चॅटजीपीटी आणि रिक्षाचालक.  
राष्ट्रीय

'हाय ChatGPT'! बंगळुरात भाषेची अडचण झाली दूर, रिक्षा भाडेही केले कमी, व्हिडिओ व्हायरल

ChatGPT Vs Autowala | बंगळूरमध्ये विद्यार्थ्याचा कन्नडमध्ये ऑटो-रिक्षा चालकाशी संवाद साधण्यासाठी ChatGPTचा वापर

दीपक दि. भांदिगरे

ChatGPT Vs Autowala

बंगळूर : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आपल्या रोजच्या जीवनातील समस्या सोडवण्याच्या पद्धतीत झपाट्याने बदल घडवून आणत आहे. आता तर ते भाषेतील अडथळे दूर करण्यासदेखील मदत करत असल्याचे दिसून आले. त्याचा प्रत्यय एका विद्यार्थ्याला आला. बंगळूरमध्ये एका विद्यार्थ्याने कन्नडमध्ये ऑटो-रिक्षा चालकाशी संवाद साधण्यासाठी आणि रिक्षा भाडे कमी करण्यासाठी चक्क 'OpenAI'च्या ChatGPTचा वापर केला.

विशेष म्हणजे त्या विद्यार्थ्याला कन्नड भाषा येत नव्हती. तरीही चॅटजीपीटीची मदत घेऊन त्याने ऑटोचे भाडे कन्नडमध्ये ठरवले. त्याने त्यासाठी चॅटजीपीटीच्या व्हॉइस असिस्टंटचा वापर केला. त्याने या माध्यमातून ऑटो चालकाला भाडे कमी करण्याची विनंती केली. त्यानंतर तडजोड झाल्यानंतर अखेर रिक्षा भाडे २०० रुपयांवरून १२० रुपयांपर्यंत कमी करण्यात आले.

एआयचा स्मार्ट पद्धतीने वापर केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर सोशल मीडिया यूजर्संनी रोजच्या जीवनातील परिस्थितीला सामोरे जाताना एआय आता भाषा संवादातील अडथळे कसे दूर करू शकते? याचे उदाहरण देत सदर विद्यार्थ्याचे कौतुक केले आहे.

'हाय चॅटजीपीटी...', व्हिडिओ व्हायरल

हा नाविन्यपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ साजन महतो या यूजर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत महतो चॅटजीपीटीला संकेत देताना म्हणतो, "हाय चॅटजीपीटी, बंगळूरमधील ऑटो चालकाशी वाटाघाटी करण्यासाठी तुम्ही माझी मदत करावी. ऑटो ड्रायव्हर म्हणतो की रिक्षा भाडे २०० रुपये द्यावे लागेल. पण मी एक विद्यार्थी असून कृपया भाडे कमी करून १०० रुपये करण्यासाठी वाटाघाटी करा."

त्यासाठी त्याने चॅटजीपीटीच्या व्हॉइस असिस्टंटचा वापर केला. एआयने कन्नड स्थानिक भाषेतून वाटाघाटी केल्या. ते म्हणते, "अण्णा, मी दररोज या मार्गाने प्रवास करतो. मी एक विद्यार्थी असून कृपया १०० रुपये घ्या."

'मला भाडे कमी करणे शक्य नव्हते, पण...'

त्यानंतर कमी वेळेत, पण यशस्वीपणे रिक्षा चालकाशी बोलणे झाले. सुरुवातीला २०० रुपये भाडे मागणाऱ्या ऑटोचालकाने तडजोड करुन अखेर १२० रुपये भाडे कमी करण्यास सहमती दर्शवली. "मी २०० रुपये सांगितले होते आणि मी १५० रुपयांपर्यंत खाली आलो. त्यानंतर तुम्ही पुन्हा विनंती केल्यामुळे, मी आणखी ३० रुपये कमी केले आणि १२० रुपयांवर तोडगा झाला. मला भाडे कमी करणे शक्य नव्हते," असे ऑटो चालकाने स्पष्ट केले. महतो लगेच 'हो' म्हणून रिक्षामध्ये बसला. विशेष म्हणजे हे सर्व एआयच्या मदतीने झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT