राष्ट्रीय

राष्ट्रपतींच्या अभिभाषणात उमटणार एनडीए सरकारच्या योजनांचे प्रतिबिंब

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तारूढ झाल्यानंतर संसदेच्या पहिल्या अधिवेशामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सरकारच्या आगामी कल्याणकारी योजनांची झलक बघायला मिळणार आहे. या अधिवेशनात सरकारच्या वतीने मांडल्या जाणाऱ्या संपूर्ण अर्थसंकल्पाची माहिती स्पष्ट होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात 5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीयांना आयकरातून सुट दिली जाण्याची शक्यता आहे.

18 व्या लोकसभा संसदेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात पहिल्या दोन दिवसांमध्ये नवनिर्वाचित खासदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली जाणार आहे. दरम्यान 26 जून रोजी राष्ट्रपतींचे अभिभाषण होणार आहे. आगामी अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसह उद्योग क्षेत्रालाही दिलासा देऊन अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर दोन्ही सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणात शेतकरी, बेरोजगारी, आर्थिक सक्षमता, सीमेवरील सुरक्षा, दहशतवादविरोधातील कठोर कारवाई, संविधान संरक्षण यासारख्या मुद्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सामान्य जनतेसाठी सरकारकडून चालविल्या जाणाऱ्या योजनांचा विस्तार, मनरेगा आणि पंतप्रधान शेतकरी कल्याण योजनेचाही उल्लेख राहण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आगामी अर्थसंकल्पात प्रत्यक्ष कर व्यवस्था आणखी सुलभ करण्यावर विचार सुरू आहे. केंद्रीय महसूल सचिव संजय मल्होत्रा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कन्फेडरेशन आफ इंडियन इंडस्ट्रीचे (सीआईआई) अध्यक्ष संजीव पुरी यांनी 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना आयकरात सवलत देण्याची सूचना केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे उत्पादन शुल्क कमी करण्याचाही सरकारचा विचार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT