657 Crore Bank Scam Pudhari
राष्ट्रीय

657 Crore Bank Scam: गर्लफ्रेंडवर उधळला सरकारी खजिना! दरमहा 10 लाख, कोट्यवधींचं घर; डान्सरच्या प्रेमात बँक अधिकाऱ्याचा कारनामा

657 Crore Bank Scam: हरियाणा आणि चंदीगडमधील 657 कोटींच्या बँक घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Rahul Shelke

657 Crore Bank Scam: हरियाणा आणि चंदीगडमध्ये समोर आलेल्या तब्बल 657 कोटींच्या बँक घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घोटाळ्याचा मुख्य आरोपी ऋभव ऋषी याने एका डान्सरच्या प्रेमात पडून सरकारी पैशांची मोठ्या प्रमाणावर हेराफेरी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासात ऋभवने घोटाळ्यातील पैशांचा मोठा हिस्सा आपल्या गर्लफ्रेंडवर खर्च केल्याचे सीबीआयच्या तपासातून समोर आले आहे.

‘द ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, ऋभव ऋषीची 2015 मध्ये एका डान्सरशी पहिली भेट झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये फारशी बातचीत झाली नव्हती. त्यानंतर काही वर्षांनी दोघांची पुन्हा भेट झाली आणि त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. 2025 मध्ये झालेल्या भेटीनंतर ऋभवने प्रेम व्यक्त केल्याचे तपासात समोर आले आहे.

ऋभव आधीपासून विवाहित होता. मात्र, त्याने पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते, असा दावा सीबीआयसमोरील जबाबात करण्यात आला आहे.

चंदीगडमधील कार्यक्रमात झाली पहिली भेट

सीबीआयला दिलेल्या जबाबानुसार, संबंधित महिला बिहारमधील सिवानची रहिवासी आहे. ती डान्सर म्हणून कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होती. तिची ऋभवशी पहिली भेट चंदीगडमधील एका कार्यक्रमात झाली.

यानंतर मे 2025 मध्ये जयपूरमधील एका फार्महाऊसवरील पार्टीत दोघांची पुन्हा भेट झाली. यावेळी ऋभवने तिच्याशी संवाध साधला. त्यानंतर 5 जुलै 2025 रोजी मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली. याच भेटीत ऋभवने तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले, असा दावा महिलेने केला आहे.

स्वतःला बँक मॅनेजर आणि इव्हेंट प्लॅनर असल्याचे सांगितले

सीबीआयच्या चौकशीत महिलेने सांगितले की, ऋभवने स्वतःची ओळख इव्हेंट प्लॅनर आणि IDFC फर्स्ट बँकेचा ब्रांच मॅनेजर अशी करून दिली होती. त्याने आयात-निर्यातीचा व्यवसाय असल्याचेही सांगितले होते. ऋभवने पत्नी दिव्या अरोरा हिला घटस्फोट देऊन संबंधित महिलेशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचा दावा आहे. या आश्वासनामुळे त्यांच्यातील संबंध आणखी घट्ट झाले.

डान्स सोडण्यासाठी दरमहा 10 लाख रुपये

सीबीआयच्या तपासानुसार, ऋभवने संबंधित महिलेला डान्सचे काम सोडण्यास सांगितले. त्याबदल्यात ऑगस्ट 2025 ते जानेवारी 2026 या काळात तिला दरमहा 10 लाख रुपये दिल्याचे समोर आले आहे. या काळात तिला एकूण सुमारे 56 लाख रुपये देण्यात आल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे.

गर्लफ्रेंडसाठी 4 कोटींचं घर

ऋभवने केवळ पैसेच दिले नाहीत, तर तिच्यासाठी कोट्यवधी रुपयांचे घर घेण्याची तयारीही केली होती. 18 जुलै 2025 रोजी दिल्लीतील द्वारका येथे सुमारे 4 कोटी रुपये किमतीचे घर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या घरासाठी 1 लाख रुपये टोकन म्हणून देण्यात आले होते. संबंधित महिलेने 49 लाख रुपये दिले, तर उर्वरित रक्कम ऋभवने भरल्याचा दावा आहे. 2 जानेवारी 2026 पासून ती महिला या घरात राहत असल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे.

फाइव्ह स्टार हॉटेलपासून परदेश दौऱ्यापर्यंत खर्च

ऋभव आणि त्याची गर्लफ्रेंड चंदीगड आणि दिल्लीतील अनेक फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिल्याचे तपासात समोर आले आहे. दोघांनी गोव्यातील एका मोठ्या हॉटेलमध्येही मुक्काम केला होता.

ऑगस्ट 2025 मध्ये दोघे मकाओ आणि थायलंडला गेले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांनी दुबईतील प्रसिद्ध बुर्ज अल अरब हॉटेलमध्ये मुक्काम केला. याच काळात ऋभवने तिला दुबईतील एक विला दाखवून भविष्यात 5 ते 10 वर्षांनी तिथे स्थायिक होण्याचे स्वप्न दाखवल्याचा दावा आहे. जानेवारी 2026 मध्ये दुबईला गेल्यानंतर टोयोटा लँड क्रूझर बुक केल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

सरकारी अधिकाऱ्यांसाठीही महागड्या पार्ट्या

या प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. जेड मॅनर, जिरकपूर येथे अनेक पार्ट्या आयोजित करण्यात आल्याचे सीबीआयच्या तपासात आढळले आहे.

या पार्ट्यांना हरियाणा सरकारमधील काही अधिकारी आणि या प्रकरणातील इतर आरोपी उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्येक पार्टीसाठी सरासरी 15 ते 20 लाख रुपये खर्च होत असल्याचे तपासात समोर आले आहे.

गर्लफ्रेंड आता सीबीआयची साक्षीदार

या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे ऋभवची गर्लफ्रेंड आता सीबीआयसमोर साक्षीदार झाली आहे. चौकशीदरम्यान तिने ऋभवसोबतच्या संबंधांबरोबरच त्याच्याकडून मिळालेल्या पैशांची आणि इतर महागड्या भेटवस्तूंची माहिती दिल्याचे वृत्त आहे. सीबीआय आता घोटाळ्यातील पैसा नेमका कुठे गेला, याचा तपास करत आहे.

या प्रकरणात IAS अधिकारी पंकज अग्रवाल यांच्यावरही आरोप आहेत. त्यांच्या अखत्यारितील विभागांमधून सुमारे ₹60.54 कोटींची हेराफेरी झाल्याचा आरोप आहे.

सीबीआय आता शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैसा कसा फिरवण्यात आला आणि त्यातील किती रक्कम ऋभव, त्याची पत्नी आणि इतर संबंधित व्यक्तींच्या खात्यांमध्ये पोहोचली, याचा तपास करत आहे. 657 कोटींच्या या घोटाळ्यात प्रेमसंबंध, महागड्या पार्ट्या, परदेश दौरे आणि कोट्यवधींच्या मालमत्तेचा संबंध समोर आल्याने या प्रकरणाची चर्चा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT