LPG carrier Symi
नवी दिल्ली: तब्बल २० हजार टन लिक्विड प्रोपेन आणि ब्युटेन घेऊन निघालेले 'सिमी' हे मालवाहू जहाज गुजरातच्या कांडला येथील दीनदयाळ बंदरात सुरक्षितपणे दाखल झाले आहे. मार्शल आयलंडचा ध्वज असलेल्या या जहाजाने १३ मे रोजी अत्यंत संवेदनशील मानली जाणारी होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर ऊर्जा पुरवठा विस्कळीत झालेला असताना, हे जहाज भारतात सुरक्षितपणे पोहोचल्याने देशाच्या ऊर्जा क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. या जहाजावर २१ कर्मचाऱ्यांचा ताफा असून, यात ८ युक्रेनियन आणि १३ फिलिपिनो नागरिकांचा समावेश आहे.
सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करणारे 'सिमी' हे ११ वे एलपीजी जहाज आहे. या जहाजाचा प्रवास सुरक्षित करण्यात भारताच्या नौवहन महासंचालनालयाने महत्त्वाची भूमिका बजावली. परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयासोबत केलेल्या समन्वयामुळेच हे जहाज सुरक्षितपणे भारतात आणणे शक्य झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
गेल्या ७५ दिवसांपेक्षा जास्त काळापासून होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर प्रचंड ताण आला आहे. याचा फटका भारतालाही बसला असून, गेल्या काही महिन्यांत देशातील कच्च्या तेलाचा साठा तब्बल १५ टक्क्यांनी घटला आहे.
'केपलर' या कमोडिटी ॲनालिटिक्स फर्मच्या आकडेवारीनुसार, मध्य पूर्व संघर्ष सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच फेब्रुवारीच्या शेवटी भारताचा एकूण कच्च्या तेलाचा साठा १० कोटी ७० लाख बॅरल्स होता. यात आता घट झाली असून तो ९ कोटी १० लाख बॅरल्सवर आला आहे. यामध्ये धोरणात्मक राखीव साठा, रिफायनरी साठा आणि व्यावसायिक साठ्याचा समावेश आहे.
कच्च्या तेलाच्या आयातीत घट झाली असली, तरी भारतीय तेल कंपन्यांनी सध्या प्रक्रिया आणि उत्पादन पातळी स्थिर ठेवली आहे. अद्याप उत्पादनात कोणतीही मोठी कपात करण्यात आलेली नाही. मात्र, पुरवठ्यातील हा अडथळा असाच कायम राहिल्यास, कंपन्यांना कच्च्या तेलाच्या प्रक्रियेत कपात करावी लागेल, अशी भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
भारताचा सध्याचा कच्च्या तेलाचा वापर प्रतिदिन सुमारे ५० लाख बॅरल्स इतका आहे. 'केपलर'च्या आकडेवारीनुसार, सध्या उपलब्ध असलेला कच्चा तेलाचा साठा देशाची पुढील १८ दिवसांची गरज भागवू शकतो. भारताप्रमाणेच जागतिक पातळीवरही कच्च्या तेलाच्या साठ्यात मोठी घट होत आहे. 'इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी'च्या अहवालानुसार, जागतिक तेलाचा साठा मार्चमध्ये १२.९ कोटी बॅरल्सने आणि एप्रिलमध्ये ११.७ कोटी बॅरल्सने खालावला आहे.