Vande Mataram Turns 150: ‘वंदे मातरम्’ हे गीत 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला प्रत्येक शाळेत नक्कीच गायल जातं. पण ‘वंदे मातरम्’ हे फक्त एक भावगीत नाही, ते स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा आहे. या गीताचा इतिहास, त्याची निर्मिती आणि वाद काय आहेत जाणून घेऊया.
या ऐतिहासिक गीताच्या रचनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेत आजपासून विशेष चर्चा सुरू आहे. हिवाळी अधिवेशनातील दहा तास खास या चर्चेसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. गीताच्या निर्मितीपासून ते आजवरच्या वादांपर्यंत अनेक मुद्द्यांवर संसदेतील दोन्ही सदनांमध्ये चर्चा सुरु आहे. या निमित्ताने जाणून घ्या,वंदे मातरम् बद्दलचे 5 प्रश्न, ज्याची उत्तरे प्रत्येक भारतीयाला माहिती असलीच पाहिजेत.
1) ‘वंदे मातरम्’ कोणी लिहिले?
हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले. हे गीत मूळतः संस्कृत आणि बांग्ला मिश्रित भाषेत लिहिले गेले होते. यातील शब्दरचना हाच या गीताचा प्राण मानला जातो.
2) हे गीत प्रथम सार्वजनिकरित्या कधी आणि कुठे गायले गेले?
‘वंदे मातरम्’ प्रथम 1896 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात सादर झाले.
हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी गायले होते आणि त्यानंतर हे गीत देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांचे प्रेरणास्थान बनले.
3) हे गीत प्रथम कोठे छापले गेले?
1882 मध्ये बंकिमचंद्रांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत ‘वंदे मातरम्’ प्रथम प्रकाशित झाले. या कादंबरीत ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या संघर्षाचे वर्णन आणि गीताची भूमिका अतिशय प्रभावीपणे मांडली आहे.
4) ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा कधी मिळाला?
24 जानेवारी 1950 रोजी ‘जन गण मन’ला राष्ट्रगीताचा दर्जा देऊन ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीतासमान सन्मान देण्याचा ऐतिहासिक निर्णय याच दिवशी झाला. त्या दिवसापासून हे गीत भारताच्या राष्ट्रभावनेचे प्रतीक बनले.
5) स्वातंत्र्यलढ्यात या गीताची काय भूमिका होती?
स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम्’ हे फक्त गीत नव्हते तर ती राष्ट्रीय घोषणा होती. ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकजुटीचे प्रतीक म्हणून हे गीत गाताना शेकडो क्रांतिकारक तुरुंगात गेले, अनेकांनी प्राणही गमावले.
अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजातील काही गट ‘वंदे मातरम्’ हे गीत गाण्याचे टाळतात. त्यांचा या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्यासही आक्षेप आहे. हा वाद आजही राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. 7 नोव्हेंबर 2025 रोजी या गीताने 150 वर्षे पूर्ण केली. भारत सरकार तसेच अनेक राज्यांनी या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत.