Kashmir Girl Murder Pudhari
राष्ट्रीय

Kashmir Girl Murder: काश्मीर हादरलं! 12 वर्षीय मुलगी बेपत्ता, दुसऱ्या दिवशी घराजवळ मृतदेह; बलात्कारानंतर हत्येचा संशय

Kashmir Girl Murder: काश्मीरमधील बडगाम येथे बेपत्ता झालेल्या 12 वर्षीय मुलीचा मृतदेह घराजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात बलात्कार आणि हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Kashmir Girl Murder: काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात 12 वर्षीय मुलीच्या संशयित बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी संध्याकाळी बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह रविवारी सकाळी तिच्या घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण काश्मीरमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी शनिवारी संध्याकाळी घराबाहेर गेली होती. मात्र रात्री ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी उशिरा रात्री पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

रविवारी सकाळी सुमारे 7.15 वाजण्याच्या सुमारास घराजवळील एका मोकळ्या जागेत मुलीचा मृतदेह सापडला. बडगामचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हरिप्रसाद के. के. यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हे बलात्कार आणि हत्येचे प्रकरण असल्याचा संशय आहे. वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिसांनी सुरुवातीला शनिवारी रात्री अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडल्यानंतर FIR मध्ये आणखी गंभीर कलमे जोडण्यात आली आहेत.

तपासासाठी CCTV आणि डॉग स्क्वॉडची मदत

या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या परिसराच्या एक किलोमीटर परिसरात शोधमोहीम सुरू केली असून, डॉग स्क्वॉडची मदत घेतली जात आहे. तसेच परिसरातील सर्व CCTV फुटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया

ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, ही घटना अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, “लहान मुलीची ही दुर्दैवी हत्या मन हेलावून टाकणारी आहे.” तसेच दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी सरकार सर्व तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मेहबुबा मुफ्तींची संतप्त प्रतिक्रिया

मेहबुबा मुफ्ती यांनी या घटनेला अत्यंत अस्वस्थ करणारी म्हटले आहे. “12 वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्येची बातमी ऐकून मन सुन्न झाले. त्यात बलात्काराच्या आरोपामुळे ही घटना आणखी धक्कादायक आहे,” असे त्यांनी म्हटले.

मीरवाईज उमर फारूक यांचा संताप

मीरवाईज उमर फारूक यांनीही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांनाही सुरक्षित वाटत नसेल, तर आपण समाज म्हणून कुठे चाललो आहोत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकरणाची सखोल, पारदर्शक आणि वेळेत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT