पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील डोंगराळ भागात सोमवारी मध्यरात्री भूस्खलन झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२८ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती केरळ सरकारने दिली. दरम्यान, भूस्खलनानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली शेकडो लोक तिथे अडकल्याची भीती आहे. लष्करासह-एनडीआरएफचे मदतकार्य सुरु असून, पावसाचा जोर कायम असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. (Wayanad landslide )
केरळधील वायनाडमधील मेप्पडी येथे ४ तासांत तीन भूस्खलनाच्या घटना
घटनास्थळी हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर, 225 लष्कराचे जवान तैनात
केरळ सरकारने दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला
वायनाडमधील भूस्खलनाबाबत केरळचे मुख्य सचिव डॉ. व्ही. वेणू यांनी सांगितले की, 'परिस्थिती अजूनही गंभीर आहे. अजूनही बरेच लोक बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. मदत पथकातील एक टीम नदी ओलांडण्यात यशस्वी झाली आहे; परंतु आम्हाला मदत देण्यासाठी आणि नदीच्या पलीकडे बचाव कार्य सुरू करण्यासाठी आम्हाला तेथे पोहोचावे लागेल. आज आणि उद्या या परिसरात पावसाचा रेड अलर्ट आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर उडू शकत नाहीत. एनडीआरएफ पूर्ण क्षमतेने मदतकार्य करत आहे. भारतीय लष्करही मदतीला आहे.
अनेक कुटुंबांना विविध शिबिरांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी हलविण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर नियंत्रण कक्ष उघडण्यात आला आला. आपत्कालीन मदतीसाठी 9656938689 आणि 8086010833 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
घटनास्थळी भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि आपत्ती निवारण दल (DRT) पाठवले आहे. आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना तत्काळ मदत दिली जात आहे. रिलीफ टीममध्ये उच्च प्रशिक्षित ICG कर्मचारी आणि एक वैद्यकीय टीम यांचा समावेश आहे. बचाव कार्यासाठी रबर इन्फ्लेटेबल बोटी, पाणी आणि ड्रेनेज समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी डिझेलवर चालणारे पंप, सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेट, रेनकोट आणि प्रतिकूल हवामानात कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी रेनकोट आणि गम बूट आणि इतर अत्यावश्यक सामग्री देण्यात आली आहे. मलबा साफ करण्यासाठी आणि प्रभावित भागात प्रवेश करण्यासाठी साहित्य पुरविण्यात आले आहे.