

अदिस अबाबा : Ethiopia landslide : इथिओपियाच्या दुर्गम भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 157 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. दक्षिण इथिओपियातील केन्चो शाचा गोजदी जिल्ह्यात घडलेल्या या दुर्घटनेत लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध यांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
गोफा झोनच्या संपर्क कार्यालयाचे प्रमुख कासाहुन अबेनेह यांनी सांगितले की, गोफा झोन हे प्रशासकीय क्षेत्र आहे जेथे भूस्खलन झाले. 22 जुलै रोजी सकाळी झालेल्या भूस्खलनात बहुतांश लोक गाडले गेले. परिसरात शोध मोहीम सुरू आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. आतापर्यंत 157 जणांचा मृत्यू झाला आहे. इथिओपियामध्ये जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळ्यात भूस्खलन होण्याच्या घटना घडतात. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत हा मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.
‘सोमवारी सकाळी झालेल्या भूस्खलनात बहुतेक लोक गाडले गेले. यानंतर बचाव कर्मचाऱ्यांनी शोध मोहिम राबविली. ढिगाऱ्यातून पाच जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले. अनेक कुटुंबे गाडली गेली आहेत. इतरांना वाचवण्याच्या प्रयत्नात भूस्खलनाचा तडाखा बसलेले अनेक लोक बेपत्ता आहेत. त्या बेपत्ता लोकांचाही शोध घेत आहे. अनेक मुले आहेत ज्यांनी त्यांच्या आई, वडील, भाऊ आणि बहिणीसह त्यांचे संपूर्ण कुटुंब गमावले आहे’, अशीही अबेनेह माहिती दिली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या मानवतावादी व्यवहारांच्या समन्वय कार्यालयानुसार, दक्षिण इथिओपियाचा हा भाग अलिकडच्या काही महिन्यांत अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित झाला आहे. यापूर्वी मे 2016 मध्ये, याच भागात अतिवृष्टीनंतर पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये किमान 50 लोकांचा मृत्यू झाला होता.