अविनाश शिंंदे www.pudhari.news  
Latest

नाशिक : लोकशाहीबद्दल आम्हाला अक्कल शिकवू नये…. काय म्हणाले अविनाश शिंदे

अंजली राऊत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

पाठीत खंजीर खुपसण्यात माहीर असलेल्या, राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढणाऱ्या आणि ज्यांच्यामुळे जिल्हा बँका डबघाईस आल्या त्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याने आम्हाला लोकशाही, संविधान आणि विकासाबाबत अक्कल शिकवू नये, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे लगावला.

नाशिक दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीवर सडकून टीका केली. कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार उभे करून वंचित बहुजन आघाडीने लोकशाही व संविधान गुंडाळून ठेवले व पाडापाडीचे राजकारण करीत आहेत तसेच भाजपाला ते मदत करीत आहे असा आरोप केला त्याचा अविनाश शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत. त्यामुळे संविधान आणि लोकशाही म्हणजे काय याबाबत कुणी आम्हाला ज्ञान न पाजळता तुमच्या घरात काय जळते याकडे लक्ष द्या. भाजपाबरोबर झालेला पहाटेचा शपथविधी अजूनही लोक विसरलेले नाहीत. शरद पवार यांच्या संगण्यावरूनच हा शपथविधी झाला होता असा खुलासा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे त्यामुळे संविधान आणि लोकशाही कोण पायदळी तुडवते हे लोकांना चांगलेच ठाऊक आहे. 1978 साली केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुमचे आजोबा शरद पवार यांनी राज्यात सरकार स्थापन केले तेव्हा कुठे गेली होती लोकशाही, असा सवालही शिंदे यांनी केला.

भाजपा पक्षाला आमचा पहिल्यापासूनच विरोध आहे आणि तो कायम राहील. धरसोड वृत्तीचे राजकारण आम्ही कधी केलेले नाही आणि करणारही नाही. इतरांना विकासाचे राजकारण करण्याचा सल्ला देण्याची आपली प्रगल्भता आहे काय. हे एकदा रोहित पवार यांनी आधी तपासून बघावे. राज्यातील सहकारी चळवळ कुणामुळे मोडकळीस आली. अनेकांचे संसार कुणी उद्ध्वस्त केले. जिल्हा बँका कुणी डबघाईस आणल्या याचे आत्मपरीक्षण राष्ट्रवादीने आणि विशेषतः रोहित पवार यांनी केल्यास विकासाचे राजकारण कोण करते आणि त्याला कोण खीळ घालते याचे उत्तर त्यांना लगेचच मिळेल, अशी खिल्लीही शिंदे यांनी उडवली. लोकशाहीत कुणालाही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे.जनाधार आजमावून पाहणे हा त्यामागचा उद्देश असतो.त्या अनुषंगानेच पोटनिवडणुकीत आम्ही आमचे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे रोहित पवार यांना मिरच्या का झोंबल्यात हेच कळत नाही. राज्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढतच असल्याने ते कदाचित राष्ट्रवादीला सहन होत नसावे आणि त्यामुळेच नैराश्याच्या भावनेतून वंचितवर रोहित पवार कदाचित टीका करीत असावेत, असेही शिंदे शेवटी म्हणाले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT