पुणे : ज्येष्ठ दाम्पत्याला लुटणारे चौघे अटकेत | पुढारी

पुणे : ज्येष्ठ दाम्पत्याला लुटणारे चौघे अटकेत

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे व धामणी येथे ज्येष्ठ दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून व जिवे मारण्याची धमकी देत रात्रीच्या वेळी चोरी करणार्‍या चार अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांनी संगमनेर तालुक्यातून अटक केली आहे. यातील तिघांना पुढील तपासकामासाठी मंचर व पारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी दरेवाडी भागात सापळा लावून आकाश फड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दोन्ही ठिकाणचे गुन्हे त्याचे इतर चार साथीदार रवींद्र भाऊसाहेब फड ( वय 30), वैभव दिगंबर नागरे (वय 20), अतीश बाळासाहेब बडवे (वय 23), नंदकुमार पवार (वय 21, चौघेही रा. दरेवाडी, ता. संगमनेर, जि. नगर) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. चोरीतील दागिने हे साकूर (ता. संगमनेर) येथील साई आदर्श को-ऑ. सोसायटीमध्ये तारण ठेवल्याचे सांगितले आहे.

पुढील तपास मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर व पारगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी या तपासासाठी सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, पोलिस जवान अक्षय नवले, सुपेकर, विरकर असे पथक तयार केले होते.

Back to top button