पाणी भरण्यासाठी महिला, पुरुषांनी केलेली गर्दी. 
Latest

Nashik Water scarcity : चांदवडमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, टॅंकर येताच महिलांची झुंबड

गणेश सोनवणे

चांदवड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- चालू वर्षी चांदवड तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यापासूनच गावागावातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र होऊन पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. चांदवड तालुक्यातील २२ गावे व ३२ वाड्या-वस्त्यांवर टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत जाणार असल्याने तालुक्यातील वाकी, निंबाळे, डोंगरगाव येथील पाच वस्त्यांवरदेखील पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत.

चांदवड तालुका हा अवर्षणप्रवण पट्ट्यात मोडत असल्याने कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. चालू वर्षी तर अल निनोच्या प्रभावामुळे चांदवड तालुक्यात संपूर्ण पावसाळ्यात पाऊसच झाला नसल्याने नदी, नाले, तलाव, धरणे अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत. नागरिकांसह जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाद्वारे पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. मात्र, शासनाद्वारे पुरवण्यात येणारे पाणी तुटपुंजे असल्याने घरातील कामकाज करताना महिलावर्गाला मोठी कसरत करावी लागत आहे. गावागावांत-वस्त्यांवर टॅंकर आल्यावर पाणी भरण्यासाठी झुंबड उडत असल्यामुळे पाणी भरण्यावरून शाब्दिक चकमक होत आहे. पिण्याचे टॅंकर सुरू करण्यासाठी तालुक्यातील वाकी, निंबाळे व डोंगरगाव येथील पाच वस्त्यांवर पाण्याचे टॅंकर सुरू करण्याची मागणी तेथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली असून, त्यासाठी प्रशासनाची मोठी धावपळ होणार आहे.

या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

दरेगाव, कातरवाडी, डोणगाव, परसूल, हिरापूर (धनगरवाडी), भोयेगाव, कोकणखेडे (गोपाळ, वाघाड वस्ती, खेमणार वस्ती), शिंगवे (शिंदे व काळे वस्ती), परसूल (आदिवास्ती), मेसनखेडे खुर्द, वाकी खुर्द, कुंदलगाव, वडगावपंगू, वाहेगावसाळ (गांगुर्डे वस्ती, दत्तनगर, खैरे वस्ती, मुस्लीम वस्ती, सोनीसांगवी (रेडगाव, विटावे रोड वस्ती), गंगावे (नरोटे वस्ती), तळेगावरोही (लक्ष्मीनगर, गाढे व मोढा वस्ती), कळमदरे (वाकनीक मळा, जाधव वस्ती, जांभळीचा मळा), काळखोडे (डुकरे, तुळजाभवानी नगर, शेळके वस्ती व नगर), पिंपळगाव ढाबळी, वाद, वराडी, बोपाणे, कानडगाव, निमोण, पाथरशेंबे (भालदर्डी वस्ती), नांदूरटेक (शेड वस्ती, चिंचबारी), देवरगाव (गोधडे व गायसान वस्ती), भडाणे, कळमदरे, उसवाड, कोकनखेडे (अहिरे वस्ती), हिरापूर, राहुड, गंगावे, रेडगाव खुर्द (काळे व इनाम वस्ती), कुंडाणे.

येथून पाणीपुरवठा

महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या ४४ गाव पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलकुंभातून दररोज तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणाहून दररोज १० ते १२ हजार लिटर क्षमतेच्या २२ टॅंकरने पाणीपुरवठा होतो आहे. ४९ विहिरी पाण्यासाठी अधिग्रहण केल्या असून, तेथून पाणीपुरवठा केला जातो.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT