बायकोचे ऐकले अन् बनला कोट्यधीश! | पुढारी

बायकोचे ऐकले अन् बनला कोट्यधीश!

अबुधाबी : कुणाचे भाग्य कधी व कसे उजळेल, हे काही सांगता येत नाही. अमेरिका किंवा आखाती देशांमध्ये कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागल्याच्या अनेक बातम्या येत असतात. विशेषतः, संयुक्त अरब अमिरातमध्ये अनेक भारतीय लोकांनीही असे जॅकपॉट जिंकलेले आहेत. मध्य-पूर्व देशांमध्ये लॉटरी खरेदी करणे सामान्य आहे. येथे लोक लॉटरी जिंकून क्षणात श्रीमंत होतात. असाच काहीसा प्रकार आताही एका भारतीय व्यक्तीसोबत घडला आहे. केरळमधील एका व्यक्तीने संयुक्त अरब अमिरातमध्ये लॉटरी जिंकली आहे. पत्नीचे ऐकून त्याने विशिष्ट क्रमांकाची तिकिटं निवडली आणि यामध्ये त्याला तब्बल 33 कोटी रुपये मिळाले!

‘खलीज टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, 40 वर्षीय राजीव अरिक्कट यांनी नुकतेच मोफत तिकीट क्रमांक 037130 वर जॅकपॉट जिंकला आहे. राजीव हे येथे आर्किटेक्चरल ड्राफ्टस्मन म्हणून काम करतात. गेल्या 10 वर्षांपासून ते अल ऐनमध्ये राहतात. त्यांनी ‘खलीज टाइम्स’ला सांगितले की, ‘मी गेल्या तीन वर्षांपासून लॉटरीचे तिकीट खरेदी करत आहे; पण जिंकण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे.’

लॉटरी जिंकण्यासाठी त्याने एक युक्ती वापरली. त्याच्या पत्नीने त्याला 7 आणि 13 क्रमांकाची तिकिटं निवडण्यास मदत केली, या त्याच्या दोन मुलांच्या जन्मतारखा आहेत. मात्र, त्यांना मोफत तिकिटावर जॅकपॉट लागला. बिग तिकीट ही अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित करण्यात येणारी बक्षीस सोडत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला अशी बातमी आली होती की, यूएईमध्ये राहणार्‍या एका भारतीय ड्रायव्हरने 45 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती.

Back to top button