नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरुच आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत सिमेन्स लगत असलेल्या आहेर इंजिनिअरींग कंपनीच्या प्रवेशद्वारावर आज (दि. 7) सकाळी १० वाजता कंपनीचे मॅनेजर नंदकुमार आहेर (वय ५०) यांची अज्ञात व्यक्तीने तलवारीने वार करून हत्या केली. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड औद्योगिक वसाहतीत सिमेन्स कंपनी लगत प्रवीण आहेर यांची आहेर इंजिनिअरींग कंपनी आहे. या कंपनीत त्यांचे पुतणे नंदकुमार आहेर हे व्यवस्थापक आहे. नंदकुमार आहेर हे सकाळी १० वाजता कंपनीच्या प्रवेशद्वारावर उतरले असतांना तीन अज्ञात हल्लेखोरांनी आहेर यांच्यावर तलवारीने वार केला व दुचाकी वरून पलायन केले. यावेळी आहेर यांच्या आवाजाने कंपनीतील कामगार दिपक नेरकर, सचिन चौधरी, अमोल शिंदे प्रवेशद्वारावर पोहोचले. त्यांनी जखमी आहेर यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनास्थळी पोलिस आयुक्त जयंत नाइकनवरे, पोलिस उपायुक्त अमोल तांबे, पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर, पोलिस निरीक्षक नंदन बगाडे दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून तलवार व चाकु जप्त केला आहे.
नंदकुमार आहेर यांचा १ जून रोजी ५० वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यांच्या पश्यात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ते मुळचे चांदवड वडाळीभोई येथील आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या कोणत्या कारणावरुन झाली त्याचा तपास पोलिस करीत आहेत. पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून तीन हल्लेखोरांचा तपास करण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहे.