Latest

नाशिक इलेक्ट्रिक उद्योगांचे व्हावे हब : राधाकृष्ण गमे

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पायाभूत सुविधा पुरविल्यास औद्योगिक विकास होतो. उद्योग क्षेत्रात अव्वल क्रमांक टिकविण्यासाठी आयटी उद्योग मोठ्या प्रमाणात येण्यासाठी मोठ्या जागेची गरज आहे. शाश्वत औद्योगिक विकास करताना उपलब्ध पाण्याचे नियोजन गरजेचे आहे. रोजगार देणारे स्टार्टअप निर्माण व्हावे, अशी अपेक्षा आहे. भविष्यात नाशिक इलेक्ट्रिकल उद्योगाचे हब व्हावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

१९ ते २२ मेदरम्यान आयोजित केलेल्या निमा पॉवर एक्झिबिशनच्या बोधचिन्ह आणि माहितीपुस्तिकेच्या सातपूर येथील निमा हाउस येथे आयोजित केलेल्या अनावरणाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, मानद सचिव राजेंद्र अहिरे, निमा पॉवर कमिटीचे चेअरमन मिलिंद राजपूत, विद्युत निरीक्षक भागवत उगले आदी उपस्थित होते.

गमे म्हणाले की, 'नाशिक-पुणे रेल्वेचे भूसंपादन तातडीने करण्यास गती मिळाली आहे. सुरत-चेन्नई महामार्गाच्या भू-संपादनालाही वेग आला आहे. कुंभमेळ्याचे नियोजन सुरू आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात ग्रीन फिल्डमध्ये प्रदर्शन केंद्रासाठी भव्य जागा आणि अन्य बाबींचा अंतर्भाव होता, याचीही आठवणही गमे यांनी करून दिली. तर कुमठेकर यांनी सर्वांना रास्त दरात वीज कनेक्शन मिळाले तर यापुढील युग पॉवर क्षेत्राचे असेल, असे सांगितले.

उगले यांनी नाशिकचा विकासदर आणि वीज ग्राहकांची संख्या अधिक आहे. ऊर्जा, उद्योग व कामगार हे घटक महत्त्वाचे आहेत. विद्युत उपकरणांची मोठी यादी आहे. ऊर्जा क्षेत्राला मोठा वाव आहे. मात्र त्याच्या सुरक्षेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. तर बेळे यांनी, ऑटोमोबाइल हबबरोबरच आता नाशिक हे इलेक्ट्रिकल हब म्हणूनही नावारूपास आले आहे. प्रदर्शनात परदेशी गुंतवणूकदार, कॉन्सुलेट जनरल, नामवंत कंपन्यांचे पर्चेस मॅनेजर, सीईओ, स्वतः मालक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. स्टार्टअप हबद्वारे ५०० उद्योजक घडविण्याचा मानसही बेळे यांनी व्यक्त केला.

यावेळी कामगार उपआयुक्त विकास माळी, आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी, आशिष नहार, शशांक मणेरीकर, खजिनदार विरल ठक्कर, गोविंद झा, डी. जी. जोशी, जयंत जोगळेकर, रवींद्र झोपे, राजेंद्र वडनेरे, विराज गडकरी, वैभव जोशी, संजय सोनवणे, श्रीधर व्यवहारे, जितेंद्र आहेर, मनीष रावळ, श्रीकांत पाटील, रवि शामदासानी, एस. के. नायर, सुधीर बडगुजर, सुरेंद्र मिश्रा, सतीश कोठारी, निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, मधुकर ब्राह्मणकर, संजीव नारंग, चेंबरचे संजीव शाह आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT