Latest

नाशिक : ‘लेक वाचवा, लेक वाढवा’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी गंगाथरन डी. 

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हाभरात महिला दिनानिमित्त 'लेक वाचवा, लेक वाढवा' जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मंगळवारी (दि. २८) आरोग्य यंत्रणांना केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहामध्ये आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व तंबाखू नियंत्रण कायदा 2003 अंतर्गत जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, डॉ. उत्कर्ष दुधेडिया, सुनील राठोड, डॉ. अनंत पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भागवत फुलारी, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम विभागाच्या उज्ज्वला पाटील यांच्यासह ग्रामीण, उपजिल्हा व महिला रुग्णालयाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, 'लेक वाचवा, लेक वाढवा' अभियानाची अंमलबजावणी करताना आरोग्य विभागासोबत शिक्षण, महिला व बालविकास या विभागांचे सहकार्य घ्यावे. पीसीपीएनडीटी समितीच्या आढावाप्रसंगी मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टीने आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविकांच्या माध्यमातून गावपातळीवर गर्भवतींचे सर्वेक्षण करावे. त्यातील पहिले अपत्य मुलगी असेल, अशा गर्भवतींचे समुपदेशन करावे. तसेच सर्वेक्षण केलेल्या गर्भवतींची प्रसूतीबाबत सविस्तर माहिती घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

कडक कारवाई करावी : जिल्हाधिकारी
नोंदणी नसलेल्या सोनोग्राफी सेंटर्सची माहिती घेत त्यांच्यावरही निगराणी ठेवावी. जेणेकरून अनोंदणीकृत सोनोग्राफी सेंटर्सच्या माध्यमातून गर्भलिंग निदान होणार नाही. ज्या सोनोग्राफी सेंटर्सवर गर्भलिंग निदान होत असल्याचे आढळल्यास त्या सेंटर्सवर कडक कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी बैठकीत दिले.

सहा तालुके तंबाखूमुक्त : नेहते
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व तंबाखू नियंत्रण कायदा 2003 अंतर्गत जिल्हास्तरीय समितीने वर्षभरात राबविलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, चांदवड, पेठ, कळवण व सुरगाणा हे सहा तालुके तंबाखूमुक्त झाले. एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत जिल्ह्यातील साधारण 500 शाळांमध्ये तंबाखूमुक्त शालेय अभियान राबविल्याची माहिती डॉ. नेहते यांनी दिली.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT