सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
शहरातील शिवाजीनगर परिसरात नायलॉन मांजात अडकून जखमी झालेल्या घुबडाला जीवदान देण्यासाठी पक्षिमित्र, पक्षी अभ्यासकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. वन विभागाच्या अधिकार्यांकडून घुबडाला ताब्यात घेण्यात टाळाटाळ केल्याने नाशिक येथे खासगी रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात उपचार करून हे जखमी घुबड वन विभागाच्या ताब्यात दिले.
शहरातील शिवाजीनगर येथील बगिच्यात एका झाडाखाली मांजात अडकून गंभीर जखमी झालेले घुबड पडले असल्याचे उद्योजक किशोर देशमुख यांच्या लक्षात आले. देशमुख यांनी पशुवैद्यक योगेश मोगल यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून पक्षिमित्र विक्रम कडभाने यांच्या ताब्यात हे जखमी घुबड दिले. घुबडाच्या उजव्या बाजूच्या पंखाचे हाड मांजाने कापल्याने ते गंभीर जखमी होऊन निपचित पडले होते. त्याची ही स्थिती पाहून पक्षिमित्र कडभाने यांनी वन विभागाशी संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून उपचारासाठी संसाधने उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी पक्षी अभ्यासक डॉ. प्रशांत वाघ यांच्याशी संपर्क साधून या जखमी पक्षावर उपचारासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली. डॉ. वाघ यांनी जखमी घुबड मोहदरी वन उद्यानात नेले. मात्र तेथील कर्मचार्यांनीही हात झटकले.
त्यामुळे वाघ यांनी या उद्यानाजवळच असलेल्या आपल्या मालकीच्या खासगी खोलीत घुबडाला पाणी पाजून, खाद्य दिल्यानंतर ते सुस्थितीत आले. त्यानंतर नाशिक येथील ईको-एको या पर्यावरण संस्थेचे अभिजित महाले यांच्याशी संपर्क साधून उपचारासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी शिंदे येथील टोल नाक्यापर्यंत येत डॉ. वाघ यांच्याकडून जखमी घुबड ताब्यात घेतले.
त्यानंतर नाशिक येथे खासगी रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात उपचार करून हे जखमी घुबड वन विभागाच्या ताब्यात दिले. त्याच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे महाले यांनी सांगितले.
वन विभागाच्या भूमिकेबाबत नाराजी
मांजात अडकून गंभीर जखमी झालेल्या शृंगी घुबडाला जीवदान देण्यासाठी पक्षिमित्र, पक्षी अभ्यासक विविध ठिकाणी संपर्क साधून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी टाळाटाळ केल्याने पक्षिमित्रांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.