Latest

Nashik News : गायक सुरेश वाडकर यांच्या स्वीय सहायकाकडे २० कोटींच्या खंडणीची मागणी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- प्रसिद्धी गायक सुरेश वाडकर यांच्या स्वीय सहायकाकडे दोघांनी २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात दोघा अज्ञात व्यक्तींविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाडकर यांनी शहरातील नाशिकरोड परिसरालगत संगीत महाविद्यालय सुरु करण्यासाठी भूखंड खरेदी केल्याचे समजते. या जागेची पाहणी करण्यासाठी वाडकर यांचा स्वीय सहायक मुनीराज मीना (४९, रा. वसई, जि. पालघर) हे मंगळवारी (दि.६) सकाळी ११.३० वाजता जागेची पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळी दोन व्यक्ती तेथे आल्या व त्यांनी मीना यांना अडवत जागेत जाण्यापासून रोखले. दोघांनी मीना यांना या जागेचे प्रकरण आमच्याकडे आल्याचे सांगून तडजोड होईपर्यंत या ठिकाणी प्रवेश करू नये, असे धमकावले. तसेच दरगोडे बंधूना १५ कोटी आणि आमच्या टोळीसाठी पाच कोटी रुपये द्यावेत, अन्यथा जिवे मारण्यात येईल, अशी धमकी दोघांनी दिली. त्यामुळे मीना यांनी उपनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात खंडणीची फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी दोघांचा शोध घेतला जात असल्याची माहिती उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दिली.

2013-14 पासून गाजतय प्रकरण

गायक सुरेश वाडकर यांच्या भुखंड खरेदीचा प्रश्न २०१३-१४ पासून गाजत आहे. गत महिन्यात शहरात वाडकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये संगीत महाविद्यालयासाठी जागा खरेदी व्यवहारात कशी फसवणूक झाली, याची कैफियत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडली होती. या व्यवहारात बरेचसे काम होत आले असून उर्वरित काम कुठे अडकले ते माहीत नसल्याने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही वाडकर यांनी पवार यांच्याकडे केली होती. त्यावेळी पवार यांनी वाडकर यांचे मुंबईप्रमाणेच नाशिकमध्ये संगीत महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT