Crime news : उदापूर येथे वीजपंपाची केबल चोरणारे दोघे गजाआड | पुढारी

Crime news : उदापूर येथे वीजपंपाची केबल चोरणारे दोघे गजाआड

ओतूर : पुढारी वृत्तसेवा :  उत्तर पुणे जिल्ह्यात वीजपंप व केबल चोरीच्या वारंवार घटना घडत असताना उदापूर येथे केबल चोरणारे दोन चोरट्यांना ओतूर पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून एकूण 22 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कृष्णा सकरू शिंगवे (वय 35, रा. बदलपाडा, ता. कुडाळ, जि. पालघर) व कैलास जगन वागे (वय 30, रा. काकडपाडा, ता. कल्याण, जि. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या केबलचोरांची नावे आहेत. याप्रकरणी भूषण कुलवडे (रा. उदापूर) यांनी ओतूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी भूषण कुलवडे हे शनिवारी (दि. 3) रात्री त्यांच्या विहिरीतील वीजपंपाला स्टार्टर बसविण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या वीजपंपाची केबल नसल्याचे दिसून आले.

त्यांनी केबलचा शोध आजूबाजूच्या परिसरात घेतला असता त्यांना पुष्पावती नदीच्या तीरावर दोन जण केबल जाळताना दिसून आले.
कुलवडे यांनी मित्रांच्या मदतीने या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत या दोघांनी केबल चोरीची कबुली दिली. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नदिम तडवी व संदीप लांडे हे पुढील तपास करीत आहेत.

Back to top button