Latest

Nashik : लासलगावला ७०० टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया

गणेश सोनवणे

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

बाजारात कांद्याचा पुरवठा व्यवस्थित सुरू राहावा, म्हणून केंद्र सरकारने विशेष दक्षता बाळगण्यास आतापासून सुरुवात केली आहे. काढणीनंतरच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात ७०० टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया केल्याची माहिती प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली.

केंद्र सरकार नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे कांद्यावर किरणोत्सर्ग विकिरण प्रक्रियेचे काम करत आहे. येत्या काही दिवसांत कांद्याचे दर आवाक्याबाहेर जाऊ शकतील, ही शक्यता लक्षात घेत सरकारने कांद्यावरच प्रथम इरेडिएशन तंत्रज्ञानाची चाचणी सुरू केली आहे. त्यातून कांद्याचे शेल्फ लाइफ वाढविण्यावर भर दिला जात असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली.

मार्च ते मे महिन्यात वाढलेले तापमान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब यामुळे यंदा बाजारात टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला असून, भावात वाढ झाली आहेत. तशी परिस्थिती कांद्याच्या बाबतीत उद‌्भवू नये म्हणून केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कांद्यावर विकिरण प्रक्रिया करून कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याने यावर आता काम सुरू झाले आहे. विकिरण केलेला कांदा शहापूर येथील कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवला जात आहे. तेथील कोल्ड स्टोअरेजची क्षमता पूर्ण झाल्यानंतर नाशिक येथील अंबडमधील गोदामात साठवला जाणार आहे. तसेच नव्याने बांधण्यात येत असलेल्या कोल्ड स्टोअरेजचे काम लासलगावला प्रगतिपथावर असून, तेथेही कांदा साठवला जाणार आहे.

इरेडिएशन तंत्रज्ञान काय आहे

कोणताही खाद्यपदार्थ किंवा पाकीटबंद वस्तू गॅमा किरण आणि क्ष-किरणांच्या इलेक्ट्रॉन रेडिएशनमध्ये येण्याला विकिरण म्हणतात. इरेडिएशन प्रक्रियेमुळे कांद्याला अंकुर येत नाहीत. त्यांची सडण्याची शक्यता कमी होते आणि कांद्याची टिकवण क्षमता वाढते. याला विकिरण तंत्रज्ञान असेही म्हणतात.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT