राज्यभर दस्तनोंदणी ठप्प ! 500 दस्तनोंदणी कार्यालयांत सर्व्हर डाऊनचा परिणाम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या तिजोरीत दरवर्षी 20 ते 25 हजारांहून अधिक महसूल देणार्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या
दस्तनोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाऊन होण्याची समस्या गेल्या चार ते पाच दिवसांपासून येत आहे. या समस्यांमुळे दस्तनोंदणीचे काम संथगतीने सुरू आहे. दस्तनोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आलेल्या नागरिकांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे. तर काही नागरिकांना दस्तनोंदणीसाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. राज्यात असलेल्या 500 दस्तनोंदणी कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, हा सर्व्हर पूर्ण क्षमतेने केव्हा सुरू होईल याची माहिती कोणीही देत नाही.
सर्व्हर डाऊन होण्याची समस्या संपूर्ण राज्यात आहे. त्यामुळे दुय्यम निबंधकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दस्तनोंदणी प्रणालीमधील तांत्रिक समस्येमुळे दस्तनोंदणीचे काम संथगतीने सुरू आहे. अपेक्षित वेग मिळत नसल्याने दस्तनोंदणीसाठी नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे, तर काहींना दस्त नोंदणीसाठी दुसर्या दिवशी पुन्हा कार्यालयात यावे लागत आहे.
याबाबत नागरिकांनी तक्रारी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागात दिल्या आहेत. मात्र, त्या तक्रारीवर अद्यापतरी यावर तोडगा काढण्यात नोंदणी विभागाला यश आलेले नाही.
याविषयी अवधूत लॉ फाउंडेशनचे मार्गदर्शक श्रीकांत जोशी यांनी सांगितले की, सध्या क्लाऊडद्वारे सेवा पुरविली जात आहे. परंतु, ही सेवा वारंवार खंडित होत असल्याने दस्तनोंदणी प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात या संवेदनशील विषयावर सखोल चर्चा घडवून नोंदणी विभागास स्वतंत्र सर्व्हर उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ते पाऊले उचलावीत, अशी मागणी आमदारांकडे केली आहे. नोंदणी विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, दस्तनोंदणीसाठी येणार्या अडचणी सोडविण्याचे काम सुरू आहे. याप्रश्नी अधिकार्यांनी चर्चा केली आहे. दुपारपासून काही अंशी दस्तनोंदणी प्रक्रिया सुरळीत करण्यास यश आले आहे. लवकरच दस्तनोंदणी प्रक्रियेस वेग येईल.
हे ही वाचा :
नाशिकमध्ये ॲपल कंपनीच्या नावे बनावट साहित्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई