Latest

Nashik Drug Case : ड्रग्ज प्रकरणी भुसेंचा राजीनामा घ्या : संजय राऊत

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राची काळजी असेल, तर त्यांनी नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, असे आव्हान देत या प्रकरणात पालकमंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. (Nashik Drug case)

गुरुवारी (दि. 12) नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी ड्रग्ज प्रकरणी गृहमंत्री फडणवीस व पालकमंत्री भुसे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला. राऊत यांनी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, ललित पाटील या ड्रग्ज माफियांला ससूनमध्ये कुणी भरती केले? येरवड्यातून बाहेर कुणी काढले? त्यानंतर ससूनचे डीन यांना कोणता मंत्री आणि भाजपचे आमदार बहुमोल मार्गदर्शन करत होते. गुन्हेगार कसा पळून गेला आणि त्याचे नाशिक भाजपसोबत कनेक्शन काय आहे, हे सगळे रेकॉर्डवर आल्याचा दावा राऊत यांनी केला. (Nashik Drug case)

भाजप नेत्यांना खोके

भाजपमधले काही प्रमुख नेते, आमच्याकडून शिंदेसेनेत गेलेले काही मंत्री त्यांच्याकडून खोके, पेट्या कसे घेत होते, हे सगळे रेकॉर्डवर असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ द्यायची असेल, तर प्रथम भुसेंचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी आग्रही मागणी राऊत यांनी केली.

'भुसेंचा १७८ कोटींचा भ्रष्टाचार'

भुसे यांनी शेतकऱ्यांच्या पैशातून १७८ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. मी आरोप केल्यावर त्यांनी मला नोटीस पाठवली आहे. त्यांनी माझ्याविरोधात कितीही खटले दाखल केले, तरी हे लपून राहणार नाही. मी ईडीकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. सध्या त्यांच्यावर कारवाई होणार नसली, तरी २०२४ मध्ये त्यांच्यावर नक्की कारवाई होईल, असा दावाही राऊत यांनी यावेळी केला.

गुन्हेगारांची तुरुंगातून सुटका

गेल्या वर्षभरात राज्यातील गुन्हे वाढत आहेत. गुन्हेगारांना तुरुंगातून बाहेर काढून त्यांचा वापर राजकारणासाठी केला जातो. ही नवीन 'मोडस ऑपरेंडी' आहे. निवडणुका जशा जवळ येतील, तसे खून, दरोड्यातील गुन्हेगार बाहेर काढून त्यांना निवडणुकीत उतरवले जाईल, असा आरोपही त्यांनी केला.

ईडीमुळेच भुजबळ भाजपसोबत

शरद पवार आणि भाजपविषयी छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावरही राऊत यांनी भाष्य केले. भुजबळ खोटे बोलत असून, महविकास आघाडी ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या नेत्यांनी तयार केली आहे. महाविकास आघाडी सुरू असताना भुजबळ नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते. त्यामुळे भुजबळ काय म्हणत आहेत, त्याला काहीच महत्त्व नाही. भुजबळांना ईडीपासून संरक्षण हवे होते म्हणून त्यांनी भाजपसोबत जाऊन मंत्रिपद घेतले, असा दावाही राऊत यांनी केला.

नार्वेकरांनी कायद्याचा मुडदा पाडला

आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणावर भाष्य करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही राऊत यांनी टीकास्त्र डागले. या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांकडून न्याय मिळेल अशा फार अपेक्षा नाहीत. विधानसभा अध्यक्ष यांनी वेळकाढूपणा सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगूनदेखील निर्णय झालेला नाही. विधानसभा अध्यक्षांनी संविधान आणि कायदाचा मुडदा पाडलेला आहे, असा आरोपही खा. राऊत यांनी केला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT