नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; कृषी पर्यटनाने द्राक्षांचे महत्त्व अधिक वाढताना शेतकर्यांच्या दर्जेदार उत्पादनाला उत्तम भाव मिळण्यास मदत होईल. नाशिक जिल्हा द्राक्ष राजधानी ठरली आहे, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) गंगापूर धरण येथील ग्रेप पार्क सिटी येथे ग्रेप हार्वेस्ट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी शनिवारी (दि. 26) खा. गोडसे बोलत होते. यावेळी एमटीडीसीच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोेड, ऑल इंडिया वाइन असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश होळकर, तानचे अध्यक्ष राकेश बकरे, सुला वाइनचे उपाध्यक्ष संजीव पैठणकर, सोमा वाइनचे प्रदीप पाचपाटील आदी उपस्थित होते.
महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी 8 ला द ग्रेस ग्रेप एस्केप फॅमिली कार ट्रेझर हंट कार्यक्रम रंगला. त्यामध्ये 20 कार सहभागी झाल्या होत्या. नाशिक परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती होताना त्याला चालना मिळावी, यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. वॉव ग्रुपतर्फे द्राक्षांपासून विविध चविष्ट खाद्यपदार्थ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. महोत्सवात लोकनृत्य सादरीकरण, वारली चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळा तसेच फॅशन शो घेण्यात आला. यावेळी शिवसंस्कृती ढोलपथकातर्फे वादन करण्यात आले.
आजही कार्यक्रम…
महोत्सवानिमित्ताने आयोजित स्पर्धेत द्राक्षांच्या विविध प्रकारच्या 53 प्रजाती उपलब्ध करून देण्यात आल्या. या स्पर्धेतील विज्येत्यांचा सत्कार कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. रविवारी महोत्सवांतर्गत वायनरी टूर, संगीत कार्यक्रम, कॅलिग्राफी कार्यशाळा तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.