नाशिक : पुढारी वृत्तसेवा, बलात्काराच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातील संशयित आरोपीने लघुशंका आल्याचा बहाणा करत पळ काढल्याची धक्कादायक घटना शहरात गुरुवारी (दि. २८) घडली. गंगापूर रोडवरील विसे चौक याठिकाणी हा प्रकार घडला. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उमेश बंडू खांडवे (३५, रा. पिंपळणारे, ता. दिंडोरी) असे पळून गेलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. (Nashik Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश खांडवे याने अंजनेरी परिसरात तरुणीवर बलात्कार केल्लाचा आरोप आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात उमेश खांडवेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यास अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली होती. गुन्ह्याच्या अधिक तपासाठी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग कावळे, पोलीस नाईक सुदाम धुमाळ व चालक चंद्रकांत जाधव हे खांडवे यास गुरुवारी (दि. २८) त्र्यंबकेश्वर परिसरात घेऊन गेले होते. तेथून ते परतीच्या प्रवासाला निघाले असता शासकीय वाहनाने गंगापूर रोडवरील विसे चौक, पंडित लोकनाथ तीर्थ महाराज चौक, श्रीरंगनगर येथे सायंकाळी सात वाजता आले. (Nashik Crime)
खांडवे याने लघुशंकेचा बहाणा केला असता, चालकाने गाडी थांबवली. एक पोलीस व खांडवे रोडच्या दुसर्या बाजूला दुभाजक ओलांडून गेले. ही संधी साधत खांडवे याने पोलिसाच्या हाताला झटका देवून पळण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सरकारवाडा पोलीस करीत आहेत.
हेही वाचा :