नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना एकाने प्रेयसीच्या मुला-मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नासर्डी पुलाजवळील बजरंगवाडी परिसरात घडली. या प्रकरणी पीडित मुलांच्या आईने मुंबई नाका पोलिस ठाण्यात प्रियकराविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे. ३० वर्षीय संशयित आरोपी असून, तो मूळचा परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी आहे. सध्या तो कामानिमित्त नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी येथे राहत आहे.
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलांची आई संशयितासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तीन मुलांसह राहत आहे. महिलेच्या पहिल्या पतीचे निधन झाले असून, दुसऱ्या पतीपासून फारकत घेण्यासाठी तिने न्यायालयात अर्ज केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, ती संशयितासोबत जिंतूरहून नाशिकला राहण्यास आली. मुलांची आई परिसरात धुणीभांड्याची कामे करत असून, ती कामानिमित्त घराबाहेर राहत असे. याचा गैरफायदा संशयिताने घेतला. त्याने महिलेच्या ११ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. तर तिच्या दोन लहान भावांनाही कपडे काढण्यास सांगून त्यांचे चित्रीकरण केले.
संशयिताने १ जानेवारी ते १७ एप्रिलदरम्यान, महिला कामावर गेल्यानंतर घरी कोणी नसल्याची संधी साधून मुलीवर अत्याचार करत त्याचे चित्रीकरण मोबाइलमध्ये करत होता. या प्रकरणाची माहिती समजताच मुंबई नाका पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुनील राेहाेकले व पाेलिस निरीक्षक चंद्रकांत आहिरे यांनी गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल करून संशयितास पकडण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली आहे. याबाबत मुंबई नाका पाेलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार व पाेक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.