Latest

नाशिक : चांदवडच्या शेतकऱ्यांचे स्वेच्छा मरणासाठी राष्ट्रपतींना पत्र

गणेश सोनवणे

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

कांद्याच्या निर्यातीसंदर्भात केंद्र सरकार उदासीन आहे. याचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. आज चार ते पाच रुपये किलो दराने कांदा विक्री होत असल्याने कांदा उत्पादनासाठी येणारा खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटातून सावरण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्वरित कांदा पिकाला क्विंटलला ३ हजार रुपये हमीभाव द्यावा, कमी दराने विक्री झालेल्या कांद्यास प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदान शेतकऱ्यांना द्यावे यांसह इतर मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवार (दि. ३) पासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.

निष्क्रिय सरकारला जाग आणण्यासाठी चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपोषणात बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडीत सहभाग नोंदविला. यावेळी शेतकरी सेलचे जिल्हाध्यक्ष संपतराव वक्ते, नितीन थोरे, विजय जाधव, भीमराव जेजुरे आदींनी केंद्र, राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. उपोषणास समाधान जामदार, शिवाजी कासव, दत्तूमामा ठाकरे, विजय जाधव, रेवण ठाकरे, विजय कुंभार्डे, भीमराव निरभवणे, दीपांशू जाधव, बापू शिंदे, किसनराव जाधव, पप्पू कोतवाल, पंकज दखने, ॲड. अन्वर पठाण, बाळासाहेब शिंदे, कैलास कोतवाल, नंदू कोतवाल, राहुल कोतवाल, नरेंद्र कासलीवाल, अल्ताफ तांबोळी, जाहिद घासी, रत्नदीप बच्छाव आदीसह कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले आहेत.

या आहेत मागण्या

बाजारभावात सुधारणा होईपर्यंत कांद्याला अनुदान जाहीर करावे, कांद्यासह इतर शेतीमालाला बाजारभावासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, नाफेडमार्फत तत्काळ कांदा खरेदी करत प्रतिक्विंटल ३,००० रुपये भाव द्यावा, कांदा निर्यातीसाठी वाहतूक अनुदान देऊन कांदा निर्यातीसाठी वाहने / वॅगन रेल्वे उपलब्ध करून द्याव्या, कोणत्याही अटी न टाकता कायमस्वरूपी निर्यात सुरू करावी, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चासाठी प्रतिकिलो २५ रुपये अनुदान मिळावे, द्राक्ष खरेदीदारांना वाहतुकीस अनुदान द्यावे, अतिवृष्टीमुळे नुकसान व पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी.

पत्र रवाना

केंद्र व राज्य सरकार कांदा, द्राक्ष व भाजीपाला मालाला योग्य व रास्त बाजारभाव देण्यास सातत्याने असमर्थ ठरले असून, शेतकऱ्यांना उत्पन्न खर्चही पदरात पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कुटुंबाचे पालनपोषण करणे अशक्य झाले आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना प्राणत्याग केल्याशिवाय दुसरा पर्याय केंद्र व राज्य सरकारने ठेवलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी अशा आशयाचे पत्र चांदवड तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पोस्टाद्वारे पाठविले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT