पारगाव : घोड शाखेला उन्हाळी आवर्तन; शेतकरीवर्गात समाधान | पुढारी

पारगाव : घोड शाखेला उन्हाळी आवर्तन; शेतकरीवर्गात समाधान

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : डिंभे धरणाच्या डावा कालव्याच्या घोड शाखेला आवर्तन सुटल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा या पिकांना या पाण्याचा मोठा फायदा मिळणार आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लौकी, जाधववाडी, थोरांदळे, कारफाटा, नागापूर, खडकी जवळे, भराडी आदी गावांसाठी घोड शाखा वरदान ठरली आहे. सध्या या परिसरातील शेतकर्‍यांनी घेतलेल्या पिकांना पाण्याची नितांत गरज होती.

थोरांदळे, जाधववाडी या गावांमधील शेती ही घोड शाखेच्या पाण्यावरच अवलंबून आहे. थोरांदळे गावातील शेतकरी दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. प्रत्येक शेतकर्‍याकडे दूध देणारी जनावरे आहेत. शेतकर्‍यांनी जनावरांसाठी घेतलेली मका, घास, कडवळ ही चारापिके पाण्याअभावी जळू लागली होती. रब्बी हंगामात घेतलेली गहू, हरभरा, कांदा व इतर पिके देखील उन्हाळ्यामुळे जळू लागली होती. पाण्याची नितांत गरज असताना डिंभे धरणाच्या डावा कालव्यातून घोड शाखेला पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. थोरांदळे गाव व परिसरातील शेतीशिवारामध्ये पाणी पोहचल्याने शेतकर्‍यांनी घेतलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

Back to top button