नगर : ट्रान्सफॉर्मर खोलून त्यातील 480 किलोची तांब्याची तार चोरली ; पोलिसात गुन्हा दाखल | पुढारी

नगर : ट्रान्सफॉर्मर खोलून त्यातील 480 किलोची तांब्याची तार चोरली ; पोलिसात गुन्हा दाखल

बोटा : पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावच्या हद्दीतील मोघाडवाडी जवळील बालाजी स्टोन क्रेशवरील वीज कनेक्शन कट करून ट्रान्सफॉर्मर खाली उतरवून त्यातील ऑईल सोडून दिले.तर ट्रान्सफॉर्मर खोलून त्यातील 480 किलोची तांब्याची तार काढून घेत अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल गुंडाळून पोबारा केल्याची घटना गुरूवार दि.2 मार्च रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. पठार भागातील बेलापूर गावच्या हद्दीत गट नंबर 277 मध्ये आळेफाटा येथील व्यापारी विकास नारायण आंधळे यांचे मालकीचे बालाजी स्टोन क्रेशर आहे.

येथे त्यांनी नेमलेले कामगार स्टोन क्रेशर चालवतात. ते स्वतः येऊन जाऊन कामकाज पाहतात. परंतु बुधवार दिनांक 1 मार्च रोजी रात्री 11:45 वाजताच्या सुमारास स्टोन क्रेशर वरील लाईट अचानक गेली. लाईट गेल्याने कामगार झोपण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांनी ट्रान्सफॉर्मर पहिला होता. तेव्हा तो ठीक होता. लाईट आलीच नाही या कारणाने सर्वजण झोपी गेले होते.

दरम्यान गुरूवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी सहा वाजता स्टोन क्रशर वरील कामगार सुनील मेंगाळ क्रशरवर गेला असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर खाली उतरवून त्यातील ऑईल सोडून दिले होते. तर ट्रान्सफॉर्मर खोलून त्यातील तांब्याची तार काढून घेतल्याचे दिसले. कामगार सुनील मेंगाळ यांनी चोरीबाबत मालक विकास आंधळे यांना केला. या चोरीत 1 लाख 30 हजार रुपये किमतीची तांब्याच्या तारेचा मुद्देमाल चोरी गेल्याने बालाजी स्टोन क्रेशरचे मोठी नुकसान झाले आहे.

व्यापारी विकास आंधळे यांचे फिर्यादीनुसार अकोले पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याने विरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल किशोर तळपे करत आहे. अकोले पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करून त्यांच्या लवकरात लवकर मुसक्या आवळाव्या, अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहे.

पठार भागात चोरट्यांचा धूमाकूळ
पठार भागात भुरट्या चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. यात शासकीय मालमत्तेची, शेतकर्‍यांच्या मोटर सायकल, बॅटरी, मोटारी, केबली अशा शेती उपयोगी विविध वस्तूच्या चोरी तसेच बंद घरफोड्या सारख्या घटनांनी मोठे नुकसान होत आहे. यात शेतकरी, व्यापारी, सर्व सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. अनेक छोट्या- मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या चोर्‍यांच्या घटनांनी पठार भागात चोरांची दहशत निर्माण झाली आहे.

Back to top button