नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा– हिंगणवेढे येथे शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनास मोठ्या अवजड वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला. तर एकाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले आहे. उर्वरित मजुरांवर महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून ट्रक चालक पसार झाला आहे.
अजय भांगरे (२८ ) आणि माणिक मोरे ( २५ ) दोघेही राहणार गंगापाडळी असे अपघातात मृत झालेल्या शेतमजुरांची नावे आहे. गंगापाडळी येथुन कोबी कापण्यासाठी आठ शेतमजुर एम.एच. १५ सी.डी. ७७६८ या सुमो कंपनीच्या चारचाकी वाहनाने भगूर येथे शेतीच्या कामाला निघाले होते. त्यांचे वाहन हिंगणवेढे येथील खोब्रागडे फार जवळ आले. त्यावेळेस समोरून येणाऱ्या एम. एच.१५ बी.जे. १३७६ या क्रमांकाच्या मोठ्या मालवाहतूक चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिली. अपघाताच्या घटनेनंतर आरडा – ओरडा सुरू झाला. आजूबाजूचे नागरिक तातडीने अपघात ठिकाणी पोहोचले. त्यांनी मोठ्या मालवाहतूक वाहनाच्या धक्क्याने जखमी झालेल्या शेत मजुरांना तातडीने नाशिकरोड येथील महापालिकेच्या हिंदुह्रदय बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. यावेळी तीन मजुरांची प्रकृती चिंताजनक होती. त्यापैकी दोन मजुरांचा मृत्यू झाला. एका मजुराला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित मजुरांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
समाधान लक्ष्मण भांगरे, अंकुश काळू भांगरे, विक्रम गोटीराम भांगरे, दौलत पिलाजी भांगरे, दौलत पिलाजी भांगरे, गणेश किरण गारे, अशी त्यांची नावे आहे. दरम्यान अपघाताची घटना घडल्यानंतर मजुरांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. येथे मोठ्या प्रमाणात आरडा – ओरडा सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताच्या घटनेचा तपास सुरू केला. अपघातात नेमकी चूक कोणाची याविषयी पोलीस यंत्रणा शोध घेत आहे. दरम्यान शेतमजूर ठार झाल्याची बातमी नाशिक रोड परिसरातील ग्रामीण भागात समजतात सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा :