Latest

उद्धव ठाकरेंवर दबाव आणण्यासाठीच त्यावेळी माझा वापर; नरेश म्हस्के यांचे राजन विचारे यांच्यावर पलटवार

backup backup

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : नारायण राणे यांच्यासमवेत नरेश म्हस्के हे काँग्रेसमध्ये जाणार होते असा आरोप खा. राजन विचारे यांनी केला होता. त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही त्यांच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती, त्यावेळी केवळ कोकणी माणसाबद्दल सहानभूती होती. खा. राजन विचारे यांच्यासह मुंबईतील काही वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणण्यासाठी कट रचून त्यावेळी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवली. असा पलटवार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत केला.

एकनाथ शिंदे यांना कंटाळून नरेश म्हस्के हे कॉंग्रेसमध्ये जाणार होते. परंतु त्यांना परत शिवसेनेत घेऊन आलो ही माझी चुक होती असा गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांच्यासंदर्भात खा. राजन विचारे यांनी केला होता. यावर मंगळवारी (दि. १७) नरेश म्हस्के यांनी देखील खुलासा केला आहे. नारायण राणे हे कोकणचे असल्याने सगळ्या कोकण वासियांनी त्यांच्या मागे जाण्याचा विचार केला होता. त्यात विचारे देखील होते, परंतु मला जाण्याची इच्छा नसतांनाही केवळ माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांचा वापर करुन उध्दव ठाकरे यांच्यावर दबाव टाकण्याचे कटकारस्थान करण्याचे काम याच मंडळींनी केले होते असा पलटवार म्हस्के यांनी केला आहे.

दुसरीकडे शिंदे गटाकडे निवडणुका लावण्याची हिंमत नाही असा आरोप आदित्य ठाकरे यांनी देखील केला होता. मात्र महापालिका निवडणुका लावण्याच्या वेळेस सत्तेत कोण होते, उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यांनी का नाही लावल्या त्यावेळेस निवडणुका असा सवाल उपस्थित करीत त्याचे खापर आमच्यावर फोडू नका असेही म्हस्के यांनी सांगितले.

विचारे यांची निष्ठा केवळ प्रभागापुरती..

भास्कर पाटील हे आमच्या सोबतच असल्याचा दावा सोमवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आला होता. परंतु मंगळवारी म्हस्के हे पाटील यांना घेऊनच अवतरले आणि विचारे यांनी केलेल्या आरोपांची हवा काढली . मला मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचा एबी फॉर्म आला होता, विधान परिषदेचे देखील तिकीट मला मिळत होते. मात्र मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. त्यामुळे पक्षनिष्ठा आणि शिवसेना काय असते हे तुम्ही सांगू नका असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विचारे यांची निष्ठा ही केवळ त्यांच्या प्रभागापुर्तीच वेळोवेळी दिसून आली आहे. त्यांच्या मुलाने महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. केवळ प्रभागापुरते विचार करीत असल्याने आणि वारंवार पक्षविरोधी कारवाया करीत असल्यानेच स्वर्गीय दिघे यांनी त्यांना बाजूला सारले होते असा आरोपही त्यांनी केला. मात्र आम्ही स्वत: तुम्हाला त्यातून बाहेर काढले आज जे काही तुम्ही आहात, ते केवळ एकनाथ शिंदेमुळेच आहात हे तुम्ही कसे विसरलात असा सवालही म्हस्के यांनी विचारे यांना केला.

भास्कर पाटील अवतरले

मी पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे, मला कोणीही जबरदस्ती केलेली नाही, किंवा कोणत्याही जुन्या केसस बाहेर काढण्याची धमकी दिलेली नाही. त्यामुळे माझा भाऊ किंवा इतर मंडळी जे सांगत आहे, ते चुकीचे असून त्याला कोणताही आधार नसल्याचे भास्कर पाटील यांनी स्पष्ट केले. मी विचारे यांच्या घरी गेलो होतो, मात्र त्यांनीच मला बोलावले होते, ते खासदार असल्याने त्यांना तो मान मी दिला होता. असेही त्यांनी सांगितले. मला पद कसे दिले गेले याबाबत मीच अनभिज्ञ असल्याचा दावाही त्यांनी केला. एकूणच भास्कर पाटील अवतरले आणि त्यांना ठाणे शहर विधानसभा क्षेत्रच्या समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रही त्यांना देण्यात आले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT